महापालिकेकडून परवानगीची प्रतीक्षा; बससेवा सुरूची तयारी
पुणे – लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. “अनलॉक’च्या अनुषंगाने प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) वगळून बसेस चालू करण्याबाबतचे नियोजन पीएमपी प्रशासनाने सुरू केले आहे. मात्र, महापालिकेच्या निर्णयानंतरच बससेवा सुरू करण्यात येणार असल्याने, आता पीएमपी “ग्रीन सिग्नल’ची प्रतीक्षेत आहे.
संसर्गाचा धोका ओळखून सार्वजनिक वाहतूक स्थगित करण्यात आली. शहरातील पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) बससेवा देखील मागील तीन महिन्यापासून बंद आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासास मुभा देण्यात आली आहे. मात्र, आता शहर “अनलॉक’ होत असल्याने, पीएमपी सेवा सुरू व्हावी, अशी मागणी करण्यात येत होती.
या अनुषंगाने पीएमपीचे अध्यक्ष शंकर पवार यांनी काही दिवसांपूर्वी बससेवा सुरू करण्याबाबत पालिका प्रशासनाकडे प्रस्तावदेखील दिला होता. याच धर्तीवर गुरूवारी पीएमपीच्या डेपो व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आली. याबैठकीत देखील प्रतिबंधित क्षेत्र वगळून शहराच्या अन्य भागात बससेवा सुरू करण्याच्या पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय गर्दीच्या वेळात बसेसची संख्या वाढवणे, बसेसचे निर्जंतुकीकरण, तिकीट तपासणीसांच्या पथकांबाबत डेपो व्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या.
यासह आगामी काळात गर्दीच्या वेळामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत असणाऱ्या बसेसच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येणार आहे. कात्रज-शिवाजीनगर, कात्रज-लोहगाव, हडपसर-पुणे स्टेशन, पुणे स्टेशन-वाघोली, मनपा-निगडी, मनपा-भोसरी, मनपा-आकुर्डी स्टेशन, मनपा-माळवाडी आदी मार्गांवर सुमारे 20 गाड्या वाढवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी एक तासाऐवजी अर्धा तासाला बसेस उपलब्ध होतील, यासाठी सोमवारपासून बसेसचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिकेकडून परवानगी मिळाल्यानंतरच बससेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात येत असून, डेपो व्यवस्थापकांच्या झालेल्या बैठकीमध्ये शहरातील सुमारे 50 मार्ग निश्चित झाले आहेत. याशिवाय गर्दीच्या वेळेमध्ये बसेसची संख्या वाढवण्याबाबत यावेळी नियोजन करण्यात आले.
– अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक