पुणे : पुण्याच्या दौंड तालुक्यातील पारगाव येथे दोन दिवसापूर्वी भीमा नदीत सात जणांचे मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आहे. कौटुंबिक वादातून सात जणांची हत्या झालाचे सांगण्यात येत आहे. या सात जणांची हत्या म्हणजे सुनियोजित कट असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. अंधश्रद्धेतून हे हत्यांकड घडल्याचे म्हटले जात आहे. त्याच प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल आज दुपारी एक वाजता यासंदर्भात यवत पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते या प्रकणाबाबत अधिक माहिती देतील.
मोहन पवार, संगीता पवार, मुलगी राणी फुलवरे, जावई श्याम फुलवरे आणि त्यांची तीन मुले यांचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते. पवार कुटुंब हे मूळचं अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधील आहे. 17 जानेवारी रोजी या कुटुंबाने दौंड तालुक्यातील पारगाव इथल्या नदीत आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाला असल्याचे समोर आले होते. परंतु नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. त्यावर पोलिसांनी तपास केला असता मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिलाचा संशय पोलिसांना आहे. त्यावरुन पोलिसांनी चार जणांवर गुन्हा नोंद करुन अटक केली आहे.
मोहन पवार यांचा मुलगा तीन महिन्यांपूर्वी अनिल पवार आणि त्याचा चुलत भाऊ धनंजय पवार हे एकत्र त्यांच्या पेरणे फाटा इथे असलेल्या सासुरवाडीला गेले असता त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात धनंजय पवार यांचा मृत्यू झाला. धनंजयचा मृत्यू हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांना होता. मोहन पवार आणि कुटुंबियांनी काळी जादू केली आणि त्यामुळेच धनंजयचा मृत्यू झाला असं त्याच्या कुटुंबाला वाटत होता. अपघात दोघांचा झाला मात्र यात फक्त धनंजयचा मृत्यू कसा झाला असा राग धनंजयच्या कुटुंबाच्या मनात होता. त्यामुळे धनंजयच्या कुटुंबीयांनी मोहन पवार यांच्या कुटुंबाचा काटा काढायचं ठरवलं होतं.
मोहन आणि त्यांचे कुटुंबीय 17 जानेवारी रोजी भीमा नदीजवळ आल्यानंतर धनंजय याच्या घरच्यांनी त्यांची वाट अडवली. त्यांनी मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी आणि जावयाला बेशुद्ध करुन त्यांच्यासोबत असलेल्या तीन मुलांनासह नदीत फेकलं. पाण्यात बुडून या सात जणांचा मृत्यू झाला.