रायगड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 349वा वर्धापनदिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. शिवराज्याभिषेक दिनाचा मुख्य सोहळा किल्ले रायगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तर कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शाहू महाराजांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त मावळ्यांच्या वेशभूषेत किल्ले रायगडावर दाखल झाले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने किल्ले रायगडावर एकीकडे ढोलताशाचा गजर सुरू होता, तर दुसरीकडे गुलालाची उधळण करण्यात आली.
या सोहळ्याला धनगर नृत्यानं तर आगळीच बहार आणली. छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी विधिवत पूजा करून शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन साजरा केला. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी चंदुकाका सराफ अँड सन्सकडून सोन्याच्या खास 350 होनांची निर्मिती करण्यात आली होती. याच सोन्यांच्या होनांनी शिवरायांना अभिषेक करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते. या शिवभक्तांनी केलेल्या शिवरायांच्या जयघोषानं अवघा रायगड दुमदुमून गेला होता. पायरी मार्गाने जाणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी अन्नछत्र, पिण्याच्या पाण्याची बाटली तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी मर्दानी खेळ, शाहिरी अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आले होते.