लोणीकंद, (वार्ताहर)- महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि भाजपामध्ये जागा वाटपावरून अंतर्गत रस्सीखेच चालले असल्याचे दिसत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी शिरूर-हवेलीची जागा अजित पवार गटाला मिळाल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाजप कार्यकर्ते नाराज झाल्याचे पाहायला मिळाले होते.
माजी आमदार स्व. बाबूराव पाचर्णे यांनी शिरूर-हवेलीमध्ये भाजपची मोठी फळी उभी केली आहे; परंतु लोकसभे प्रमाणेच शिरूरची जागा पुन्हा अजित पवार गटाला गेल्यास लोकसभेची पुनरावृत्ती होऊ शकते,
असे वाटल्याने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी लोणीकंद येथील भाजप कार्यालयात बैठक घेऊन काहीही करून शिरूर-हवेलीची जागा जिंकायची असेल तर भाजपचाच उमेदवार रिंगणात हवा अशी आग्रही भूमिका वरिष्ठांकडे केल्यानेच शिरूरची जागा भाजप खेचून आणण्यात यशस्वी झाल्याने शिरूर हवेलीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आल्याचे पाहायला मिळत आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत जर भाजपला जागा मिळाली नाही तर बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना भाजपचे इच्छुक उमेदवार प्रदीप कंद यांनी तंबी देत शिरूर-हवेलीची जागा ही महायुतीला जिंकायचीच आहे.
महायुतीमध्ये येथील जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेल्यास लोकसभेप्रमाणे विधानसभेला गहाळ न राहता सर्वांनी जोमाने काम करत राष्ट्रवादी देईल त्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगत कार्यकर्त्यांची समजूत काढली असल्याचे वृत्त देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. प्रदीप कंदांची वेगळीच सहानभूती तयार झाली होती.
शिरूर हवेली मतदारसंघातील प्रदीप कंद यांचा दांडगा जनसंपर्क, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना या दोन्ही तालुक्यांमध्ये दिलेला कोट्यवधींचा निधी हा महायुतीला पूरक वातावरण करत असताना शिरूर-हवेलीची जागा भाजपकडे आल्यास प्रदीप कंद चांगली लढत देऊ शकतात असा संदेश महायुतीच्या वरिष्ठ पदाधिकार्यांकडे गेला असल्यानेच कदाचित शिरूर-हवेलीची जागा ही भाजपला गेली असल्याचे बोलले जात आहे.