तारळेत तारकेश्‍वर महायात्रा उत्साहात

कराड : येथील ग्रामदैवत श्री तारकेश्‍वर देवाची महायात्रा उत्साहात झाली. महाशिवरात्र हा यात्रेचा मुख्य दिवस होता. तारकेश्‍वर महाराज की जय… च्या गजरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात हा दिवस पार पडला. या वेळी भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनास गर्दी केली होती.

या वेळी भक्तांनी रांगा लावून दर्शन घेतले. दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला बीबीसी मंडळ व देणगीदारांच्या माध्यमातून उपवसाचे पदार्थ देण्यात येत होते. दुपारी दोन वाजता डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्‍वर महाराजांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिव-पार्वतीच्या मूर्ती ठेवलेल्या, तसेच आकर्षक सजावट केलेला रथ, नवलाईदेवी, सासनकाठ्यांचे पूजन करुन व श्रीफळ वाढवून रथ मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी सुहासिनी औक्षण करण्यास पुढे येत होत्या. पारंपरिक वाद्यांच्या गजरात “तारकेश्‍वर महाराज की जय’च्या घोषात, गुलालाची उधळण करत ही मिरवणूक सायंकाळी साडेसहाच्या सुमारास यात्रा स्थळावर पोहचली.

याठिकाणी धारेश्‍वर महाराजांनी प्रबोधनपर विचार मांडले. सातच्या सुमारास गोरज मुहूर्तावर शिव पार्वतीचा विवाहाने महाशिवरात्रीचा दिवस पार पडला. यानंतर बीबीसी मंडळाच्या वतीने आकर्षक रंगीबेरंगी फटाक्‍यांची बरसात करण्यात आली. या विवाह सोहळ्यास भाविक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस उपनिरीक्षक मोहन तलबार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी मिरवणूक मार्गावर वीज चालू बंद करण्याचे नियोजन केले होते. ग्रामपंचायत व यात्रा समितीने यात्रेचे नेटके नियोजन केले. विवाहानंतर लहान मुलांनी मेवामिठाई व खेळण्यांच्या दुकाने गर्दीने फुलून गेले होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.