आंबेगाव तालुका वार्तापत्र : संतोष वळसे पाटील
आंबेगाव – जुन्नर तालुक्यासाठी असलेले राज्य उत्पादन शुल्क खाते म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा अशा पद्धतीने चालू आहे. बिअरबार, देशी दारु दुकानांवर मात्र कोणत्याही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने सदर व्यवसाय मोठ्या प्रमाणावर बोकाळले आहेत. काही दुकानांमध्ये डुप्लीकेट दारु विक्री होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
आंबेगाव-जुन्नर तालुक्यातील बिअरबार,देशी दारु दुकानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नारायणगाव येथे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे कार्यालय आहे. परंतु सदर खात्याच्या वतीने मोठी कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावठी दारु विक्री केली जात आहे. काही ढाब्यांवर, बिअरबार किंवा देशी दारु दुकांनातून दारु आणून विकली जात आहे.परवाना नसतानाही दारु विक्री करण्याचे प्रकार सर्रास गावात चालू आहेत. बिअरवार,देशी दारु दुकानांना नियम आहे.परंतू या नियमांचे सर्वत्र उल्लंघन होत आहे. काही अल्पवयीन मुले बिअरबारमध्ये बसून दारु पितात.
सध्या लग्न सराईचा हंगाम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात दारुची विक्री होते. परंतु डुप्लीकेट आणि स्वस्तातील दारुमुळे विविध आजार जडून अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिअरबार, देशी दारु दुकानांतील दारुची तपासणी नियमित झाल्यास चुकीच्या गोष्टींना आळा असणार आहे. नारायणगाव येथे राजरोसपणे अवैध धंदे सुरु आहेत. काही शाळांजवळ गावठी दारुचे धंदे चालू आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी दारुचे शिकार होण्याची भीती आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कडक कारवाईचे धोरण अवलंबिले पाहिजे.अशी अपेक्षा पालकांनी केली आहे.