नवी दिल्ली – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व कस्टम मंडळादरम्यान सहकार्य करार झाला आहे. या करारानुसार दोन कर विभाग परस्परांना उपयोगी पडेल, अशी माहिती वेळोवेळी उपलब्ध करणार आहेत.
एखाद्या विभागाने विशिष्ट माहिती मागितल्यानंतर ती माहिती दुसरा विभाग उपलब्ध करणार आहे. अनेकदा अप्रत्यक्ष कर संकलनातील माहिती प्रत्यक्ष कर संकलनासंदर्भात उपयोगी पडते. या आदान-प्रदानामुळे कर चुकवेगिरीला आळा बसणार आहे. कर विभाग बाजार नियंत्रक, सेबीलाही आवश्यक ती माहिती पुरवीत आहेत.
त्यामुळे आगामी काळामध्ये सर्व व्यवहार पारदर्शक करण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदी व अप्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष अजित कुमार यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ही माहिती उपलब्ध करण्यासाठी कोणत्या तांत्रिक उपाययोजना करायच्या तसेच कोणती माहिती उपलब्ध करायची यासंदर्भात एक समन्वय समिती काम करेल.