भाजपच्या काळातच वीज बिलांची जादा थकबाकी

ना. शंभूराज देसाई; साताऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

सातारा -भाजपच्या काळातच राज्यात वीज बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे त्यांचा आंदोलनाचा फार्स असल्याची टीका राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, माजी आमदार सदाशिव सपकाळ, युवा सेनेचे रणजित भोसले, धैर्यशील कदम, शारदा जाधव, राजाभाऊ शेलार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांसह पदाधिकारी उपस्थित होते.

श्री.देसाई म्हणाले, “सध्या राज्यात भाजप वीज बिलांच्या विषयावर आंदोलनाचा फार्स करत असली तरी वीज बिलांची सर्वात जादा थकबाकी त्यांच्याच काळात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्याची सरकारकडून चौकशी होईल.’ भाजप हा विरोधी पक्ष असून सरकारच्या कामकाजावर टीका करणे हेच त्यांचे काम असले तरी टीका वैचारिक पातळीवर असायला पाहिजे, असे सांगून ना. देसाई म्हणाले, “वीज बिलांच्याबाबतीत भाजपने घेतलेली भूमिका चुकीची आहे. महाविकास आघाडी सरकार सध्याच्या परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना वीज बिले कमी कशी करता येतील यावर विचार करत आहे.’

राज्यात शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस यांच्या महाविकास अघाडीचे सरकार आहे. त्यामुळे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना व पक्षाला कमीपणा येईल असे काम कोणताही पदाधिकारी करणार नाही.

सगळ्यांनी दिवसरात्र काम करून दोन्ही उमेदवारांचा विजय खेचून आणायचा आहे. त्यासाठी एक उप जिल्हाप्रमुख, एक तालुकाप्रमुख, एक युवा सेनेचा पदाधिकारी, एक महिला आघाडीची पदाधिकारी अशी समिती नेमली असून त्याच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी दिल्याचेही देसाई यांनी सांगितले. यावेळी नितीन बानुगडे पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, धैर्यशील कदम, चंद्रकांत जाधव आदींनी मनोगते व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.