आयुक्त संदीप कदम यांची माहिती : कॉल सेंटरचा पर्याय वगळला
प्रवेश नियामक प्राधिकरण, सीईटी सेलद्वारे “सुसंवाद’
पुणे – राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी राज्य सीईटी सेलतर्फे (सीईटी सेल) तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. हेल्पलाइनसाठी उभारलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडवण्यात अपयश आल्याने; तसेच अडचणी निर्माण झाल्याने कॉल सेंटरचा पर्याय बाजूला केल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी दिली.
प्रवेश नियामक प्राधिकरण (एआरए) आणि राज्य सीईटी सेलद्वारे (सीईटी सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांबाबतच्या सुसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी “एआरए’चे अध्यक्ष जे. पी. डांगे, कदम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी शिक्षणसंस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
कदम म्हणाले, “तंत्रशिक्षण, वैद्यकीय, औषधीनिर्माणशास्त्र, कृषी अशा शाखेतील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियांमध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आले होते, तर एक कॉलसेंटर स्थापन केले होते. मात्र, या कॉलसेंटरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर हेल्पलाइनमार्फत दिल्या जाणाऱ्या उत्तरांबाबत मर्यादा येत होत्या. तर, काही वेळा चुकीची माहिती दिल्या जाण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येईल. या कक्षामार्फत येत्या शैक्षणिक वर्षासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियांबाबत विद्यार्थ्यांना अडचणी उद्भवल्यास त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी ई-मेलद्वारे केलेल्या तक्रारींचा “ट्रॅक रेकॉर्ड’ ठेवण्यात येणार असून, प्रत्येक तक्रारीची पडताळणी केल्यावर उत्तर देण्यात येईल. गरज भासल्यास विद्यार्थ्यांशी संपर्क साधून, त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल.
विधी आणि औषधीनिर्माणशास्त्र शाखेच्या पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होतात. यावर उपाय म्हणून विधी, औषधीनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू न करता, ऑक्टोबर ते ऑक्टोबर असे करावे, अशी सूचना शिक्षणसंस्थाच्या प्रतिनिधींनी केली.