भोपाळ – कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार शशी थरूर यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांना मध्य प्रदेशातील पक्षाच्या सहकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी केलेल्या स्वागतामुळे मला आनंद झाला आहे. मात्र, अन्य राज्यांमध्ये आपल्याला असा प्रतिसाद पक्षाच्या सहकाऱ्यांकडून मिळाला नाही अशी खंत थरूर यांनी व्यक्त केली आहे.
थरूर म्हणाले की, मध्य प्रदेशात मला मिळालेल्या स्वागताने मला आनंद झाला. कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कमलनाथ, विरोधी पक्षनेते गोविंद सिंग यांनी माझी भेट घेतली, असे थरूर यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे धाकटे बंधू व पक्षाचे आमदार लक्ष्मण सिंह हेही उपस्थित होते, असे त्यांनी नमूद केले.
थरूर म्हणाले की, आपले खर्गे यांच्याशी कोणतेही शत्रुत्व नाही आणि निवडणुकीनंतरही आम्ही पूर्वीप्रमाणेच एकत्र काम करणार आहोत. पक्षाध्यक्षपदी निवडून आल्यास आपण सर्वांना बरोबर घेऊन काम करू. गांधी परिवाराचे कॉंग्रेससाठी फार मोठे योगदान आहे, त्यामुळे पक्ष या परिवाराला अलिप्त ठेवू शकत नाही, असेही थरूर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले.