सोलापूर (प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, 23 जून 2019 रोजी होणार आहे. यासाठी सोलापुरातील एकूण दहा केंद्रांवर 5 हजार 91 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केल्याची माहिती येथील केंद्राचे संपर्क प्रतिनिधी तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. विकास घुटे यांनी दिली.
रविवारी होणारी सेटची परीक्षा ही 35वी असून सदरची परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि पणजी(गोवा) या केंद्रांवर एकाच वेळी घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी सोलापूर केंद्र अंतर्गत पाच हजार 91 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ केंद्र क्रमांक 20 अंतर्गत सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेज, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज, वालचंद आर्टस अँड सायन्स कॉलेज, हिराचंद नेमचंद कॉलेज, कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, एस. ई. एस. पॉलिटेक्निक, सोशल कॉलेज, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज, केगाव आणि विद्यापीठ कॅम्पसमधील संगणकशास्त्र संकुलात ही परीक्षा होणार आहे.