परीक्षेची चिंता, भीती किंवा आता आपले कसे होणार? या विचारांमुळे मुले बिथरलेली असतात. परीक्षेदरम्यान अभ्यास पूर्ण झाला नाही. तो कसाही करून पूर्ण करायलाच पाहिजे, नाहीतर काहीच आठवणार नाही. असा एक गैरसमज मुलांत असतो. खरे तर मुले वर्षभर अभ्यास करत राहतात. तो त्यांना नक्कीच परीक्षेत आठवणार.
ऐन परीक्षेच्या काळात वाचलेले तेवढे परिणामकारक नसते. माझा एक मित्र परीक्षा हॉलच्या दारातून जाईपर्यंत वाचायचा व नंतर बराच कन्फ्यूज व्हायचा म्हणून परीक्षेदरम्यान, पेपरच्या एक ते दोन तास अगोदर अभ्यास बंद करावा. अभ्यासक्रम जास्त असल्याने परीक्षेच्या काळात सर्वच वाचून होइल असे नाही; किंबहुना तसा अट्टहास ठेवू नये.
महत्त्वाचे व अतिमहत्त्वाचे वाचून घ्यावे, त्यानंतर वेळ मिळाल्यास बाकीचा अभ्यासक्रम वाचावा. परीक्षेत किती अभ्यास केला, याचे मोजमापन होत नाही, तर तुम्हाला अभ्यासाचे किती आकलन झाले हे पाहतात.
परीक्षेत आपली कामगिरी व्यवस्थित राहण्यासाठी आपले मानसिक व शारिरीक आरोग्य नीटनेटके राहणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यावश्यक आहे. ६-८ तास झोप घ्यावी. अगदी काही तास तरी ती घेणे फायद्याचे ठरते. तसेच जेवण पुरेसे करावे. म्हणजे न जेवता राहू नये. काही मुले फक्त दूध किंवा कॉफीच घेत राहतात. नेहमीपेक्षा कमी जेवण चालेल पण, शारीरिक ताकदीसाठी खाणे महत्त्वाचे. दररोजचे पौष्टिक अन्न खावे. जंक फूड टाळावे. तसेच, परीक्षेसाठी लागणारे साहित्य उदा. पेन, पेन्सिल इत्यादी एक आठवडा अगोदरच तयार ठेवावे. हे सर्व साहित्य घरात एकाच ठिकाणी ठेवावे. त्याबरोबरच हॉल तिकीट व इतर काही महत्त्वाच्या गोष्टी ठेवाव्यात. जेणे करून ऐनवेळेस शोधाशोध नको. सर्वच साहित्य एकत्र ठेवल्यास, ते विसरण्याचे चान्सेस कमी असतात.
शहरात परीक्षा केंद्र ही लांब असतात. त्यामुळे त्या प्रवासाची वेळ लक्षात घेऊन घरातून निघावे. प्रवास, ट्राफिक याचा अंदाज घ्यावा. एखाद्या अवघड प्रश्नांनी घाबरून जाऊ नये. पहिल्यांदा बाकी प्रश्न सोडवावेत व नंतर त्या अवघड प्रश्नाबद्दल विचार करावा.
परीक्षा हॉलमध्ये जाण्याच्या अगोदर, ‘मला काहीच आठवत नाही. मला काहीच येणार नाही. मी एकदम ब्लँक झालो आहे.’ अशी भीती मनात येऊ शकते. हे ब-याच वेळेस अगदी नॉर्मल असते. अशा स्थितीत न घाबरता, परीक्षा हॉलमध्ये मन शांत ठेवावे. मेडिटेशन, रिलॅक्सेशन हे पाच मिनिटांत करावे, त्यामुळे मन एकाग्र राहते. प्रश्नांची उत्तरे लिहायला सुरुवात केल्यावर ही भीती आपोआप जाते.