पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग परीक्षा दिवाळीनंतर होणार आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षेतील अनुभव लक्षात घेता या परीक्षेत कोणताही गैरप्रकार करण्याची मुभा नसेल, त्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करीत परीक्षा नियोजन पद्धतीने घेण्यासाठी विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. त्यामुळे बॅकलॉग परीक्षा योग्य पद्धतीने होणार असल्याची चिन्हे आहेत.
सध्या पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्ष परीक्षा पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. पहिल्याच ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले.
तांत्रिक कारणाने परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर होणाऱ्या बॅकलॉग परीक्षेत तंत्रज्ञानाचा वापर करीत सुरळीतपणे घेण्यासाठी विद्यापीठाने आतापासून कंबर कसली आहे.