पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विविध ठिकाणच्या परीक्षा केंद्रांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करुन उत्साहात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांवर परीक्षेसाठी शुभेच्छांचा वर्षावही करण्यात आला.
या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या परीक्षेच्या तुलनेत यंदा 13 हजार 721 परीक्षार्थ्यांची संख्या वाढल्याचे स्पष्ट होत आहे. बारावीची लेखी परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होत आहे. या परीक्षेला 8 लाख 43 हजार 552 विद्यार्थी, तर 6 लाख 61 हजार 325 विद्यार्थिनी बसणार आहेत. एकूण 9 हजार 923 कनिष्ठ महाविद्यालयांतून विद्यार्थी परीक्षा देणार असून, परीक्षा केंद्राची संख्या 3 हजार 36 आहे. तसेच, माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून, या विषयासाठी 1 लाख 33 हजार 738 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर सामान्यज्ञान या विषयाची परीक्षाही ऑनलाइनद्वारे होत असून, या विषयासाठी 3 हजार 466 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.