टीईटी परीक्षेचा मुहूर्त ठरला

परीक्षा 19 जानेवारीला

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत होणारी शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले. टीईटी परीक्षा आता 19 जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा कधी होणार? या प्रश्‍नावर पडदा पडला आहे. टीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया उद्यापासून (दि. 8) सुरू होत आहे.

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी करण्यासाठी सरकारने उमेदवारांना “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे. वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ही परीक्षा वर्षातून एकदाच होऊ लागली आहे. दरम्यान, राज्य परीक्षा परिषदेस टीईटी परीक्षा घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच टीईटी होणार आहे, हे निश्‍चित होते. मात्र ही परीक्षा केव्हा होणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते.

अखेर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेचे वेळापत्रक आज प्रसिद्ध केले. त्यात ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. टीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करावे लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबरपर्यंत आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी दिली.

आतापर्यंत पाच परीक्षा
केंद्राच्या शिक्षण हक्‍क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. त्यानुसार 2013 व 2014 या वर्षात डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. 2015 मध्ये पेपरफुटीच्या प्रकरणामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. ती परीक्षा जून 2016 मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर सन 2017 व 2018 मध्ये जुलै महिन्यात परीक्षा घेण्यात आली. आतापर्यंत अशा पाच परीक्षा झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.