पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या तारखा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केली. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 4 मे पासून सुरू होणार असून, दि.10 जूनपर्यंत संपणार आहेत. निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर केले जाणार आहेत.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीपर्यंत होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. करोनामुळे शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाल्याने ह्या परीक्षा मार्च-एप्रिलमध्येही होऊ नयेत, अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीचा विचार करत बोर्डाने थेट मेमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या परीक्षांच्या तारखांची घोषणा नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोखरियाल यांनी ट्विटरद्वारे केली. दहावी व बारावी परीक्षा 4 मे ते 15 जून या कालवधीत होणार आहे. या परीक्षांचा निकाल 15 जुलैपर्यंत लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पोखरियाल यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रात्यक्षिक परीक्षा मार्चमध्ये होणार असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना आता पुरेसा वेळ मिळाला असल्याने त्यांनी निश्चिंत मनाने आणि पूर्ण क्षमतेने परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पूर्वी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात परीक्षा सुरू होऊन त्या मार्चपर्यंत संपायच्या. मात्र 2020 मध्ये करोना परिणामामुळे शालेय शिक्षणाचे वेळापत्रक उशिराने झाले. त्याचा परिणाम सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीऐवजी आता मे महिन्यात सुरू होणार आहे.
सीबीएसई दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. तेथून विद्यार्थ्यांनी वेळापत्रक डाऊनलोड करून घ्यावे. दहावी व बारावीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे.