एसटी अधिकारी पदाची 17 मेपासून परीक्षा

आचारसंहिता शिथील झाल्याने दिलासा

पुणे – एसटीचा कारभार अधिक सक्षम आणि पारदर्शी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी वर्ग एक आणि दोन मधील अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार तब्बल साडेसहाशे पदांसाठी महामंडळाच्या वतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी पाच हजार अर्ज दाखल झाले आहेत. या पदासाठी येत्या दि. 17 ते 19 मे रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल त्यानंतर पंधरा दिवसात जाहीर करण्यात येणार आहे, पात्र, उमेदवारांची यादी त्या- त्या विभागात लावण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत एसटी महामंडळाने आपल्या कारभारात सुधारणा सुरू केली आहे, त्याशिवाय विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रवाशांना आकर्षित करण्यात येत आहे. त्यामुळे महामंडळाच्या महसूलात अपेक्षित वाढ झाली आहे, हे वास्तव असले तरीही महामंडळाचा प्रशासनावर वचक राहिला नसल्याने तोटा सहन करावा लागत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या तोट्याची कारणे शोधण्याच्या सूचना महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी संबधित विभागाला दिले होते. त्याचे सर्वेक्षण केल्यानंतर अधिकारी वर्गाची पदे रिक्‍त असल्याने ही पोकळी निर्माण झाली आहे, असा अहवाल संबंधित विभागाने मुख्य कार्यालयाला दिला होता. त्यामुळे ही पदे भरण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. त्यासाठी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला जाहिरात देण्यात आली होती. मात्र, मध्येच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. आता आचारसंहिता काही अंशी शिथील झाल्याने ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या परीक्षेच्या संदर्भात सर्व उमेदवारांना त्यांच्या पत्त्यावर लेखी पत्रे पाठविण्यात आली आहेत, त्यानुसार या उमेदवारांनी परीक्षेसाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.