‘परीक्षेचा निर्णय आठवडाभरात जाहीर करावा, अन्यथा…’

विद्यार्थी संघटनांचा तीव्र आंदोलनाचा पुणे विद्यापीठाला इशारा

पुणे – करोनाच्या वाढत्या संख्येने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. अशा मन:स्थितीत विद्यार्थी महाविद्यालयाच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेसाठी देण्यात येणाऱ्या एजन्सीविषयी अद्यापही अनिश्‍चितता आहे. त्यामुळे परीक्षेचा निर्णय विद्यापीठाने आठवडाभरात जाहीर करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.

पुणे विद्यापीठाने येत्या 15 मार्चपासून पदवी आणि पदव्युत्तरच्या प्रथम सत्राची परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार आठवभरात ही परीक्षा सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ही परीक्षा एक महिना पुढे ढकलावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण परीक्षा घेण्यासाठी जी एजन्सी नेमायची आहे, त्याचा निर्णय अजूनही झालेला नाही. पूर्वीची एजन्सी कायम ठेवायची का? नवीन एजन्सीला काम द्यायचा, याविषयी दिरंगाई होत आहे.

विद्यापीठाने परीक्षेचे तातडीने परिपत्रक प्रसिद्ध करावे आणि त्याचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने कुलगुरुंकडे केली आहे. विद्यापीठाने योग्य कंपनीची निवड करून परीक्षांचे योग्य ते नियोजन करावे. आठवडाभरात याबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचे “मनविसे’चे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यापीठ योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम नाही. परीक्षेच्या निर्णयात कायमच गोंधळ आहे. विद्यार्थ्यांना मागील वर्षी परीक्षेमध्ये आणि निकालात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे यावेळेस निविदा प्रक्रिया राबवून योग्य त्या कंपनीला देण्यात यावी. यावर्षी परीक्षेत व निकालात गोंधळ झाल्यास आंदोलन करावे लागेल, असे युक्रांदचे उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.