अचूक भविष्य वर्तवा, 21 लाख जिंका

“अंनिस’चे ज्योतिषांसाठी आव्हान, प्रश्‍नावली जाहीर

सातारा –लोकसभा निवडणूक निकालांचे अचूक भविष्य वर्तवा आणि 21 लाख रुपये जिंका आव्हान प्रक्रिया व प्रश्‍नावली “अंनिस’तर्फे जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि देशात होणाऱ्या विविध स्तरावरील निवडणूक निकालांचे भाकीत भविष्यवेत्ते प्रत्येक निवडणुकीवेळी वर्तवत असतात. त्यांचे हे भविष्य प्रसारमाध्यमांद्वारे लोकांच्या समोर येते त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांच्यात गैरसमज पसरतात आणि अंधश्रद्धा निर्माण होते, असा संघटनेचा अनुभव आहे. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या अशा वृत्तींविरोधात ठाम भूमिका घेण्यासाठी महाराष्ट्र “अंनिस’ने देशातील सर्व ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवूण बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे. त्यासाठीची प्रक्रिया व प्रश्‍नावली महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील खगोल तज्ञ व राज्य कार्यवाहक प्राध्यापक डॉक्‍टर नितीन शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. याप्रसंगी महाराष्ट्र “अनिस’तर्फे 21 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असल्याचे देखील सांगितले आहे.

लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून चमत्कार करणाऱ्या आणि फलज्योतिष सांगणाऱ्या बुवा बाबांनी केलेल्या फसवणुकीच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र अंनिस गेली अनेक वर्षे सातत्याने रचनात्मक संघर्ष करीत आली आहे. चमत्कार आणि फलज्योतिष यांच्यामधला फोलपणा महाराष्ट्र अंनिसने आपल्या शास्त्रीय मांडणीतून सिद्ध केला आहे. फलज्योतिष व बुवाबाजीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन समाजाच्या आर्थिक सामाजिक लैंगिक शोषण होऊ नये. म्हणून यासाठी संघटनेने चमत्कार आणि फलज्योतिषाची वारंवार शास्त्रीय चिकित्सा केली आहे. या चिकित्से मागे फलज्योतिषातील अवैज्ञानिक बाजू समाजासमोर यावी असा प्रयत्न राहिलेला आहे. 2008 मध्ये महाराष्ट्र अंनिस आयुका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच संख्याशास्त्रीय निकषानुसार ज्योतिषांनी वर्तविलेल्या भविष्याची अचूकता तपासण्यासाठी वैज्ञानिक चाचणी घडवून आणली होती.

सदर चाचणीत एकही भविष्यवेत्ते त्याला अचूक भविष्य नोंदविता आले नाही. तत्कालीन प्रतिथयश ज्योतिषांनी तर या चाचणीकडे अपयशी होण्याच्या भीतीपोटी पाठ फिरवली होती. ज्योतिषाचा फोलपणा लक्षात यावा म्हणून 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळीही अहवाल प्रक्रिया राबवली होती. किंबहुना महाराष्ट्रातील स्वतःला नामवंत म्हणणाऱ्या ज्योतिषांना सदर आव्हान प्रक्रिया रजिस्टर पोस्टाने पाठवली होती. परंतु एकाही ज्योतिषाने महाराष्ट्र अंनिसचे हे आव्हान स्वीकारले नव्हते. 2019 लोकसभा निवडणुकीसाठी ही समितीमार्फत आव्हान प्रक्रिया लोक प्रबोधनाचा हेतू नजरेसमोर ठेवून राबवली जात आहे.

जे ज्योतिषी या आव्हान प्रक्रियेत सहभागी होतील त्यांना समितीमार्फत एक प्रश्‍नावली दिली जाईल या प्रश्‍नावलीत एकूण 25 प्रश्‍न असतील. लोकसभा निवडणुकांमध्ये सहभागी झालेल्या विविध पक्षांना मिळणाऱ्या जागा निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या मतांची टक्केवारी. महत्त्वाच्या मतदारसंघातील विजयी उमेदवार, सर्वात जास्त मताधिक्‍क्‍याने विजयी होणाऱ्या उमेदवाराचे नाव, सर्वाधिक मताधिक्‍य मिळवणारी महिला उमेदवार, नोटा पर्यायचा सर्वाधिक वापर करणारा मतदार संघ, अशा स्वरूपाचे प्रश्‍न सदर प्रश्‍नावलीत असतील.

फलज्योतिष हे शास्त्र नाही ते थोतांड आहे ही भूमिका घेऊन फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्या ज्योतिषांना ग्राहक कायदा लागू करा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे वर्तवलेले भविष्य खरे ठरले नाही तर नुकसान भरपाई मिळण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध राहील. अशा पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र अंनिसने दिलेल्या आव्हान ज्योतिषांनी वर्तविलेल्या भविष्याचा खरेपणा सिद्ध करण्याची नामी संधी मानून स्वीकारावे असे जाहीर आव्हान अंनिस करत आहे.

या आव्हान प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवेशिका उत्तरासहित अधिकृत प्रश्‍नावली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र या नावे काढलेला रुपये 1 हजार प्रवेश विकासाचा धनादेश डीडी सीलबंद पाकिटातून 20 मे 2019 पर्यंत रजिस्टर पोस्टाने अंनिसच्या कार्यालयात पाठवणे आवश्‍यक आहे. निवडणूक आयोगाने अधिकृतपणे सर्व निकाल त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर एक आठवड्याच्या आत परीक्षेत समितीच्या योग्य त्या तपासणीनंतर आव्हान प्रक्रियेचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.