25 वर्षांनतर मिटला माजी सैनिकांचा वाद

सैनिक संघटनेकडून मध्यस्थी : करडे येथील रस्त्यावरून होते तेढ 

निमोणे – करडे (ता. शिरूर) येथे सध्या बाभुळसर खुर्द ते करडे दरम्यान अष्टविनायक महामार्गाचे काम सुरू आहे. हा रस्ता करडे येथे शिरुर-चौफुला महामार्गाला मिळतो. जिथं हा रस्ता मिळतो तिथं गावातील शेजारी राहणाऱ्या दोन माजी सैनिकांची मालकी आहे. खरं तर या जागेबाबत गेली 25वर्षांपासूनचा (1995) वाद आहे. आताही त्या दोघांच्या जागेमधून हा जुना रस्ता जात असल्याने रस्त्याचे रुंदीकरण करताना या दोन्ही माजी सैनिकांनी रस्ता आपल्याच हद्दीतून जात असल्याचा दावा केला होता. मात्र सैनिक संघटनेने मध्यस्थी करीत हा वाद मिटवण्यात यश मिळवले आहे.

नकाशावरील रस्त्याच्या खुणा आणि प्रत्यक्ष रस्ता वहिवाटीमध्ये फार मोठा बदल झाला होता. हा रस्ता नकाशाप्रमाणे सरळ करून तयार करावा, असे एका माजी सैनिकाचे म्हणणे होते. तर दुसरा माजी सैनिक वहिवाटीप्रमाणे रस्ता तयार करावा, अशी मागणी करीत होता. दोन्ही बाजूने वाद विकोपाला गेल्याने रस्त्यामुळे अनेकवेळा भांडणही झाले होते.

गावातील ग्रामस्थांनी रस्त्यासाठी अनेकवेळा प्रयत्न करूनही त्यांना अपयश आले होते. हा वाद मोजणी करून मिटविण्याबाबतच्या सूचनाही आल्या; परंतु या सर्व प्रक्रिया वेळ खाऊ असल्यामुळे रस्त्याचे काम रखडणार होते. दळणवळणसाठी हा रस्ता तत्काळ होणे गरजेचे होते. त्यामुळे त्यातील एका माजी सैनिकाने नव्याने नावारुपाला आलेल्या त्रिदल माजी सैनिक संघटनेकडे वाद मिटविण्यासाठी तक्रार दाखल केली आणि मोठ्या प्रमाणात दावे-प्रतिदावे करून अखेर त्यावर तोडगा काढून हा वाद मिटवला गेला.

त्रिदल माजी सैनिक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर संदीप लगड यांनी स्वतः आपल्या सहकाऱ्यांसोबत हा वाद मिटविण्यासाठी विशेष सहकार्य केले. त्यामुळे सर्व माजी सैनिकांनी त्यांचे आभार मानले. त्यांच्यासोबत त्रिदलचे शिरूर तालुका अध्यक्ष बाळू शेवाळे, उपसचिव तुकाराम डफळ, जे. के. कटके, सुरेश पडवळ, खडूं बोऱ्हाडे तसेच त्रिदल महिला कमिटीच्या उज्वला इचके, नंदिनी पानसरे, अश्विनी थोरात, कुमुदिनी बोऱ्हाडे, सुवर्ण लांडगे, माधुरी जगदाळे आणि 50 माजी सैनिक उपस्थित होते.

हा निघाला तोडगा
हा रस्ता दोघांच्या संमतीने सरळ करून दोघांचेही नुकसान टाळून रस्ता आखून देण्यात आला. गेले अनेक वर्षांपासून हा वाद चालू होता त्याचा निर्णय त्रिदलच्या टीमने योग्यरीत्या हाताळून मिटवला. नाहक कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यापेक्षा सामोपचाराने सैनिकांनी संघटनेच्या ट्रॅकवर येऊन आपले प्रश्न मार्गी लावावेत, अशी सूचना मेजर संदीप लगड यांनी सर्वांना केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.