पोलिसांच्या मदतीला धावले आजी-माजी सैनिक

निवडणुकीत पोलिसांचा भार करणार हलका : वडगाव निंबाळक पोलिसांच्या दिमतीला 20 सैनिक सज्ज

सोमेश्‍वरनगर – विधानसभेची निवडणूक सोमवारी (दि. 21) पार पडणार आहे. यादिवशी पोलिसांनी अधिक ताण येऊ नये म्हणून बारामती तालुका आजी-माजी सैनिक संघटना, सोमेश्‍वरचे सदस्य पोलीस दलाला मदत करणार आहेत.

राज्यात एकाचवेळी सोमवारी मतदान होणार आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांची मोठी धावपळ होणार आहे, त्यामुळे सैन्यदलातील अधिकारी पोलीस व एनएससीईची मदत घेण्याची गरज असून तशी विनंती संघटनाना करण्यात यावी, असे पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुचवले होते. त्यानुसार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ लांडे यांना बारामती तालुका आजी-माजी सैनिक संघटनेला पत्र दिले होते, त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, सचिव अनिल शिंदे, तक्रार निवारण समिती अध्यक्ष गणेश आळंदीकर, उपाध्यक्ष राजाभाऊ थोपटे, निवृत्त सुभेदार चंद्रकांत सोनवणे यांनी 20 सैनिकांची यादी वडगाव निंबाळकर निरीक्षक लांडे यांच्याकडे सुपूर्त केली आहे.

सोमनाथ लांडे म्हणाले की, वडगाव निंबाळकर पोलीस अंतर्गत एकूण 62 गावे आहेत. तर पोलिसांची संख्या केवळ 43 असल्याने निवडणुकीच्या दिवशी हे संख्याबळ तोडके पडणार आहे. मात्र, आता आजी-माजी सैनिकांचे बळ पोलिसांना साथ देणार असल्याने निवडणूक शांततेत पार पडेल. त्याचप्रमाणे सैनिक संघटनेच्या निवडणुकीत मदत करणाऱ्या प्रत्येक सदस्याला त्यांचे मतदान कक्ष असलेल्या ठिकाणी मतदान करण्याची व्यवस्था केली जाईल व या पथकाद्वारे वडगाव निंबाळकर अंतर्गत सर्व गावात मतदान व्यवस्था शांततेत व कायदेशीरपणे राबविली जाईल, असे त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.