माजी सैनिक व विधवा पत्नींना “हिंदू हृदयसम्राट’चा लाभ मिळावा

नगर  -देशसेवा केलेल्या लष्करातील माजी सैनिक तसेच सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी राज्य सरकराने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व विधवा पत्नी मालमत्ता कर माफी योजना आणलेली आहे. त्या योजनेचा नगर शहरातील माजी सैनिक तसेच सैनिकांच्या विधवा पत्नींना लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. 

राज्य सरकारनेच या संदर्भात स्पष्ट आदेश दिलेले आहेत. त्यासंदर्भात लाभार्थींना माहिती देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्‍त व कर विभागाचे उपायुक्तांना केल्या आहेत. नगर शहरातील नागरिकांना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व विधवा पत्नी मालमत्ता कर माफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदत कार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरुन 09 सप्टेंबर 2020 रोजी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यात माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी विशेष लाभाची योजना मंजूर झाली. महाराष्ट्रातील रहिवासी असलेले माजी सैनिक व किंवा माजी सैनिकांच्या विधवा पत्नींच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा शासनाकडून होत असलेल्या मालमत्ता करात पूर्णपणे सुट देण्यात आलेली आहे.

राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था कार्यक्षेत्रात योजना लागू असेल, असे आदेशातच म्हटलेले आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचा मालमत्ताकर भरण्याची गरज नाही. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी केवळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र महापालिकेत सादर करावेत, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.