बारामती -करोना व पुन्हा पुकारलेल्या लॉकडाऊनमध्ये सामाजिक भान व जाण जपत बारामती तालुका माजी सैनिक संघटना पोलिसांबरोबर शहर व तालुक्यात काम करण्यासाठी मैदानात उतरली आहे.
करोनाचा वाढता कहर व 7 सप्टेंबरपासून बारामतीमध्ये लॉकडाऊन यांमुळे शहर व तालुका पोलीस यांच्यासमवेत गस्त घालणे, नेमून दिलेल्या ठिकाणी वाहन तपासणीसाठी सहकार्य करणे, नागरिकांमध्ये करोना होऊ नये म्हणून जनजागृती करणे आणि पोलीस आदेशानुसार येणारी कामे हे पथक करणार आहे.
जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांनी निःस्वार्थीपणे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कामकाज सुरू केले आहे. बारामती शहरमध्ये माजी सैनिक यांचे कमांड निवृत्त सुभेदार विलास कांबळे काम करीत असून त्यांच्या जोडीला विविध ठिकाणी पोलिसांसमवेत माजी सैनिक कार्यरत असल्याचे राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.
यापूर्वी सुद्धा बारामतीमध्ये माजी सैनिक यांनी पोलिसांसमवेत काम केले आहे. विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा दिली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा देऊन आम्ही माजी सैनिक कृतार्थ होत आहोत.
-हनुमंत निंबाळकर, अध्यक्ष माजी सैनिक संघटना.