नगर (प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा येथील साईप्रेम हॉटेलसमोर मोटारकार उभी करण्याच्या कारणावरून माजी सैनिक विश्वनाथ फुंदे यांची हत्या केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कानडगाव (ता. राहुरी) येथील डोंगरातून पाठलाग करून चौघांना पकडले. एक जण डोंगरात पळून गेला.
सुधीर संभाजी सिरसाठ (वय 26, रा. आसरानगर, पाथडी), आकाश पांडुरंग वारे (वय 24, रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी), आकाश मोहन डुकरे (वय 24, रा.विजयनगर, पाथर्डी), गणेश सोन्याबापू जाधव (वय 23, रा. शंकरनगर, पाथर्डी) अशी आरोपींनी नावे आहेत. केतन जाधव (रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी) हा डोंगरात पळून गेला.
अधिक माहिती अशी, 6 एप्रिल 2021 रोजी सकाळी आरोपी नामे सुधीर संभाजी सिरसाठ याने मच्छिंद्र कारभारी फुंदे (रा . फुंदे टाकळी, ता. पाथर्डी) यांच्या टाकळी फाटा येथील साईप्रेम हॉटेलसमोर मोटारकार उभी केली. त्यावेळी मच्छिंद्रचे भाऊ माजी सैनिक विश्वनाथ फुंदे यांनी सुधीर सिरसाठ यास हॉटेल समोरून मोटारकार बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून सुधीर सिरसाठ याने त्याचे अन्य साथीदार बोलावून घेऊन विश्वनाथ फुंदे याला लोखंडी पाइप व रॉडने मारहाण केली. त्यानंतर तिलोक जैन विद्यालयाच्या पाठीमागे नेऊन जबरदस्तीने दारू पाजून पुन्हा मारहाण केली.
उपचारादरम्यान माजी सैनिक विश्वनाथ फुंदे याचा मृत्यू झाला. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात मच्छिंद्र कारभारी फुंदे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना संशयित आरोपी सुधीर सिरसाठ हा कानडगाव (ता. राहुरी) येथे दडून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा लावून कानडगावच्या डोंगरामध्ये पाठलाग करून वरील चार आरोपींना पकडले. त्यात एकजण पळून गेला.
आरोपी आकाश डुकरे, गणेश जाधव यांच्याविरुद्ध जेजुरी, कराड, पाथर्डी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे, पोलीस कर्मचारी मनोज गोसावी, सचिन आडबल, विशाल दळवी, संतोष लोढे, रोहीत येमूल, विनोद मासाळकर, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे आदीच्या पथकाने केली.