वेदनादायी! ऑक्‍सिजनअभावी माजी सैनिकाचा तडफडून मृत्यू; कोल्हापूरातील घटना

कोल्हापूर, दि. 4 – कारगिल युद्धात देशासाठी रक्‍त सांडलेल्या माजी सैनिकाचा ऑक्‍सिजनअभावी तडफडून मृत्यू होण्याची घटना कोल्हापुरात घडली. सर्जेराव कुरणे असे या माजी सैनिकाचे नाव असून ते गिरगावचे रहिवासी होते. करोना झाल्याने त्यांना 26 एप्रिलला रंकाळा परिसरातील महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

आज सकाळी हॉस्पिटलमधील ऑक्‍सिजन संपल्याने प्रयत्न करूनही हॉस्पिटलला ऑक्‍सिजन पुरवठा सुरळीत करता आला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटल प्रशासनाने तसे नातेवाइकांना लेखी दिले आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.

करवीर तालुक्‍यातील गिरगाव येथील माजी सैनिकाला करोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना रंकाळा टॉवर परिसरातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. शनिवारी सकाळी त्यांना जोडलेला ऑक्‍सिजन संपला, त्यामुळे त्यांनी दम लागत असल्याचे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सांगितले.

कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळाने रुग्णाची तडफड सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची ऑक्‍सिजन आणण्यासाठी धावाधाव झाली. पण यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी पत्रकारांसमोर केला. महापालिकेचे उपायुक्‍त निखील मोरे व त्यांच्या पथकांनी तसेच पोलिसांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊन घटनेची तपासणी केली.
काल सायंकाळीच संबधित हॉस्पिटलने एजन्सीकडून ऑक्‍सिजनचा पुरेसा साठा घेतला होता, तो शनिवारी दुपारपर्यत पुरेल इतका शिल्लक होता.

हॉस्पिटल प्रशासनाचा ऑक्‍सिजन जोडणीतील हलगर्जीपणा झाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. तरीही आम्ही डॉक्‍टर रिपोर्ट, पंचनामा यांची कार्यवाही सुरू केली आहे, असे उपायुक्‍त निखील मोरे म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.