पिंपरी – माजी महापौर अपर्णा डोके यांचे पती निलेश डोके यांना त्यांच्या गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी 35 लाख रूपयांचा गंडा घातला आहे. ही घटना 20 फेब्रुवारी 2021 ते 29 नोव्हेंबर 2022 या कालावधीत रावेत, शिंदेवस्ती येथील ओवी भारत गॅस एजन्सीमध्ये घडली.
याप्रकरणी निलेश चंद्रकांत डोके (रा. 45, रा. लिंकरोड, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी श्रवणकुमार मोहनराम मांजू बिष्णोई (सध्या रा. गायकवाड चाळ, जांबे, ता. मुळशी, मूळ रा. मंडलाकाला, ता. देचू, जि. जोधपूर) असे आरोपीचे नाव आहे.
माजी महापौर अपर्णा डोके यांचे पती निलेश डोके यांचे रावेत येथे ओवी भारत गॅस एजन्सी आहे. दुकानातील गॅस ग्राहकांना देणे, दुकानात विक्रीस ठेवलेले नवीन रेग्युलेटर, सुरक्षा पाईप, लायटर या वस्तुंची विक्री करण्याचे तोंडी सांगितले होते. या विक्रीमधून मिळणारी रक्कम तसेच स्कॅनरवर मिळणारी रक्कम दररोज ऑफीसच्या अकाऊंटवर जमा करण्याचे काम श्रवणकुमार बिष्णोई यांना दिले होते. मात्र, आरोपीने दुकानात दररोज मिळणारी रक्कम ऑफीसच्या अकाऊंटवर जमा केली नाही.
तसेच ऑनलाईन पद्धतीने मिळणारी रक्कम ओवी भारत गॅस एजन्सीची असल्याचे भासवत स्वत:च्या, भावाच्या व पत्नीच्या मोबाइल क्रमांकावर ही रक्कम जमा करुन घेत, 35 लाख रुपयांचा आर्थिक अपहार केला. रावेत पोलीस तपास करत आहेत.