काठमांडू – नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र हे राज्यघटनेनुसार नेपाळचे राजे बनण्यास अयोग्य असल्याचे मत नेपाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान शेर बहादुर देऊबा यांनी व्यक्त केले आहे. नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही लागू करावी, या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. राजधानी काठमांडू आणि अन्य शहरांमध्ये राजेशाही समर्थक गटांकडून रॅली आयोजित केल्या गेल्या असतानाच देऊबा यांनी ज्ञानेंद्र यांच्याविरोधात हे मत व्यक्त केले आहे.
नेपाळमध्ये २४० वर्षांपासून अस्तित्वात असलेली राजेशाही राज्यव्यवस्था २००८ मध्ये बंद करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात लोकशाही दिनाच्या निमित्ताने ज्ञानेंद्र यांनी देशाचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय ऐक्य साधण्यासाठी पुन्हा जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आता आल्याचे मत व्यक्त केले होते. तेंव्हापासून पुन्हा राजेशाही लागू करण्याची मागणी व्हायला लागली आहे.
शेर बहादुर देऊबा हे पहिल्यापासून राजेशाही पुन्हा लागू करण्याच्या विरोधात आहेत. राजे होण्यापेक्षा ज्ञानेंद्र यांनी राजकारणात उतरावे. त्यासाठी राजेशाही धार्जिण्या राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीने ज्ञानेंद्र यांना पक्षाचे अध्यक्ष करावे, असे त्यांनी सुचवले आहे.
राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीने जरी ज्ञानेद्र यांना पक्षाचे अध्यक्ष केले, तर पक्षालाही त्याचा पश्चाताप होईल. जर ज्ञानेंद्र यांना राजकारणात सक्रिय व्हायचे असेल, तर ते स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करू शकले असते, असेही देऊबा म्हणाले.
दरम्यान सध्याच्या राजकीय व्यवस्थेत बदल करण्याची गरज नाही, असे सत्ताधारी नेपाळी काँग्रेस पक्षाने म्हटले आहे सध्याची लोकशाही प्रजासत्ताक राज्यपद्धती घटना परिषदेद्वारेच अस्तित्वात आली आहे, असे नेपाळी कॉंग्रेसचे प्रवक्ते प्रकाश शरण महाल यांनीही म्हटले आहे.
सीपीएन-माओवादी सेंटर आणि सीपीएन युनिफाइड सोशालिस्ट या दोन्ही माओवादी पक्षांसह राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीसह एकूण चार प्रजासत्ताक पक्षाच्या सोशालिस्ट फ्रंटने मिळून देशात संघीय लोकशाही प्रजासत्ताक राज्यपद्धतीविरोधात एकजून दाखवण्यासाठी २८ मार्च रोजी काठमांडूमध्ये शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरवले आहे.