टोकीयो – प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणांमुळे पंतप्रधान पदावरून पायउतार होणारे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. आरोपांच्या अनुशंगाने त्यांची चौकशी करण्यात आली आहे.
मात्र आबे यांच्यावरील आरोपांचा प्रभाव जपानचे विद्यमान पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यावरही पडण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारण सुगा यांच्या निवड आबे यांनीच केली होती व त्यांनी तब्बल आठ वर्षे आबे यांचे मुख्य प्रवक्ता म्हणून काम पाहिले आहे.
एका गुप्त राजकीय खर्चाशी संबंधित हे प्रकरण असून एका राजकीय संघटनेने यासंदर्भात आरोप केला आहे. जपानमध्ये दरवर्षी चेरी ब्लॉसम पार्टींचे आयोजन केले जाते. विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींचा सन्मान करण्याचा त्यामागे उद्देश असतो.
मात्र आता या पार्टीत आपल्याच समर्थकांची वर्णी लावली जात असून त्यांचाच सन्मान केला जात असल्याचा आरोप आहे. याकरता जो निधी गोळा करण्यात आला तोही संशयास्पद असल्याचा आरोप जपान सपोर्ट ग्रुप या संघटनेने केला आहे.
जपानमधील प्रमुख माध्यमांतील वृत्तांनुसार आबे यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांच्या यामागुची या मतदार संघातून त्यांच्या असंख्य समर्थकांना टोकीयो येथे आणले जात होते. राजधानीतील पॉश हॉटेलांत त्यांची राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था केली जात होती. हे 2015 पासून मागच्या वर्षापर्यंत सुरू होते.
चेरी ब्लॉसम पार्टीच्या नावाखाली हा प्रकार होत होता. एवढ्या समर्थकांच्या राहण्या जेवण्याचा खर्च केवळ पाच हजार येन एवढाच दाखवण्यात आला आहे. प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षांत दोन पॉश हॉटेल्सचेच बिल दोन कोटी 30 लाख येन झाले आहे.
आबे यांच्या सचिवांचीही यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार उर्वरीत खर्च आबे सपोर्ट ग्रुप या संघटनेकडून करण्यात आला आहे. मात्र आबे यांचे सचिवच या गटाचे नेतृत्व करत होते व त्यांना सरकारकडून वेतन दिले जात होते.
दरम्यान, चेरी ब्लॉसम पार्टींचे आयोजन करण्यात गैर काहीच नाही. 1952 पासून जपानच्या प्रत्येक पंतप्रधानांनी अशा पार्टींचे आयोजन केले आहे, असे आबे यांनी संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांत म्हटले आहे. खेळाडू, प्रसिध्द व्यक्ती, विविध क्षेत्रांत नावलौकीक संपादन करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी हे आयोजन केले जात होते. मात्र नंतरच्या टप्प्यात या पार्टींमध्ये समर्थकांचीच वर्णी लावली जाण्याचा प्रकार सुरू झाला.