बीड : राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या केज मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना काही अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.
या हल्ल्यात संगीता ठोंबरे यांच्यासह त्यांच्या गाडीचा चालक किशोर मोरे जखमी झाले आहेत. संगीता ठोंबरे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार सुरू आहेत. हा हल्ला नेमका का करण्यात आला? याचा तपास पोलीस करत आहेत.या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून हल्लेखोरांचा तपास सुरु आहे.