“ओबीसी’च्या आरक्षणातून वाटा देणार नाही : विजय वडेट्टीवार
पुणे – मराठा समाजाला दिलेले “ईडब्ल्यूएस’चे आरक्षण ऐच्छिक आहे. ज्यांची इच्छा असेल ते घेतील. मात्र, “ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा परिणाम “ईसीबीसी’ विषयी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यावर होणार नाही, असा दावा राज्याचे पुनर्वसन आणि ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी केला. तसेच, “ईडब्ल्यूएस’चा निर्णय हा विधिज्ञांशी चर्चा करूनच घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुण्यात “ओबीसी व्हिजेएनटी जनमोर्चा’कडून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी वडेट्टीवार यांच्यासोबत संवाद बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण देताना “ओबीसी’च्या आरक्षणाला धक्का लागण्याचा प्रश्नच नाही, आम्ही तसे होऊ देणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी हे आधीच स्पष्ट केले आहे. कोणालाही “ओबीसी’च्या आरक्षणातून वाटा देणार नाही, “ओबीसी’ नेता म्हणून माझी भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाचा “ओबीसी’मध्ये समावेश होणार नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
“एमपीएससी’च्या परीक्षा घेऊ नका, असा काही लोकांचा दबाव आहे. न्यायालयाचा निकाल लागेल तेव्हाच परीक्षा घ्या, असा हट्ट काही लोकांचा असल्याने काही करता येत नाही. सर्वांची इच्छा परीक्षा लवकर व्हावी; पण काही लोकांना ते मान्य नाही, इतर राज्यात 50 टक्क्यांच्या वर आरक्षण असताना ही न्यायालयात स्थगिती मिळाली नाही. मात्र, महाराष्ट्रच्या आरक्षणाच्या विषयाला न्यायालयाने स्थगिती दिली हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यामुळेच महाराष्ट्रवरच का अन्याय होतो हे कळत नाही.
न्यायालयाचा आपण आदर करतो, त्याची प्रतिष्ठा पाळतो. काही लोक म्हणतात अमूक सरकार असते तर तमूक माणूस मुख्यमंत्री असता तर हा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असता, असे असेल तर मग सर्वोच्च न्यायालय कोणाच्या इशाऱ्यावर चालते का, असा प्रश्न निर्माण होतो, असे वडेट्टीवार म्हणाले.