सातारा: विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात शांततेत मतदान पार पडले. दरम्यान, साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान झाले. मात्र, इथे एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर घडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित ग्रामस्थांनी यासंदर्भातील आरोप केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घडाळ्यासमोरील बटन दाबल्यास व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला मत दिल्याचे दिसत होते. ग्रामस्थांच्या हा प्रकार तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. निवडणूक अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर खरोखरंच घडाळ्याला मतदान करताना ते कमळाला जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर हे ईव्हीएम बदलण्यात आलं, पण यामुळे ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ईव्हीएम मशीनमुळे मतमोजणीवरही परिणाम होणार आहे. याबाबत आता निवडणूक आयोगाकडून काही कार्यवाही केली जाणार आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.