Maharashtra Assembly Election 2024 – विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र काही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे प्रकार घडले आहेत. परिणामी मतदारांना काही काळ त्रासाला सामोरे जावे लागले.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात बी. आर हायस्कूल मध्याळा येथील बूथ क्रमांक १६९ मधील ईव्हीएम मशीन बंद पडले. सकाळी मतदान सुरू झाल्यापासून मतदान यंत्रात बिघाड झाला. यानंतर काही तासानंतर मशीन बदलून मतदानाची प्रक्रिया पार पडण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर येथील पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रुक येथील २२६ केंद्रावरील ईव्हीएम मशिन काही काळ डाऊन होते. प्रशासनाकडून मशिन बदलण्यात आले. दरम्यान, वेळ लागत असल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील विक्रम हायस्कूल मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले होते. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती.
शिवडी-लालबाग विधानसभा मतदारसंघातील आरएम भट शाळेतील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले होते. त्यामुळे नागरिकांना रांगेत ताटकत उभे राहावे लागले.
मालेगाव विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक २९२ येथील ईव्हीएम मशीन बंद पडले होते. त्यामुळे मालेगावातील अनेक मतदार चिंतेत दिसले. केवळ ईव्हीएम मशीन बंद असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
दुसरीकडे, नाशिकमधील पंचवटी संकुलातील सोनूबाई केला मतदान केंद्रावरील १८९ बूथ तांत्रिकदृष्ट्या खराब झाले. तांत्रिक बिघाडामुळे नाशिकमध्ये मतदानाला २० मिनिटे उशीर होत असल्याचे दिसून आले.