नवी दिल्ली – आसाममधील रताबारी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील एक मतदान यंत्र भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या खासगी मोटारीतून नेल्याची धक्कादायक माहिती माहिती उघड झाल्याने त्या मतदानकेंद्रात फेर मतदानाचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. या प्रकरणात मतदान केंद्र प्रमुखांसह अन्य तीन जणांना निलंबित करण्यात आले असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली अहे.
इंदिरा एमव्ही शाळेच्या मतदान केंद्र 149 मधील इव्हिएम यंत्र नेणारी मोटार करीमगंज जिल्ह्यात नागरिकांनी अडवली होती. त्यानंतर या वादाला तोंड फुटले. याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांतून व्हायरल झाल्यानंतर निवडणूक समितीने आसामच्या मुख्य निवडणूक अधिकारी आणि आयोगाच्या विशेष निरीक्षकांकडून त्याबाबतचा अहवाल मागवला. त्यानुसार या इव्हिएम मशीन घेऊन जाणारी गाडी वाटेत बंद पडली. त्यानंतर मतदान केंद्र प्रमुख आणि तीन सहकाऱ्यांनी गाडीच्या मालकाची खातरजमा न करता खासगी गाडीचा वापर केला.
करीमगंज जिल्ह्यातील कनाईशील येथे सुमारे 50 जणांच्या जमावाने ही गाडी अडवल्यानंतर मतदान केंद्र अधिकाऱ्यांना त्यांची चूक उमगली. या जमावाने या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी हे वाहन पढे जाऊ देण्यास मज्जाव केला. जमावाला त्याचे कारण विचारले असता, त्यांनी शेजारच्या मतदार संघातील उमेदवार कृष्णेंद्रु पॉल यांची ती मोटार आहे. हे इव्हिएम मशिन त्यात गडबड करण्यासाठी घेऊन जात असल्याचा आरोप केला, असे राज्य निवडणूक आयोगाच्या अहवाल नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा निवडणूक अध्धिकारी आणि करीमगंजचे जिल्हा पोलिस अधिक्षक घटनास्थळावर येईपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांना वेठीस धरले होते. त्या मोटारीतील चार जणांपैकी एक जण तोपर्यंत बेपत्ता झाला आहोता. तो जवळपासच्या भागात आज सकाळी सापडला. तपासणी केल्यानंतर या इव्हिएममीशनचे बीयु, सीयु आणि व्हीव्हीपॅटला कोणतीही हानी न होता ते सीलबंद असल्याचे आढळले. ते सर्व सर्व स्ट्रॉंग रुममध्ये जमा करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून या चारही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.