लंडन – पाळीव कुत्रे आणि मांजराच्याही शरीरामध्ये करोना विषाणूच्या संसर्गानंतर निर्माण होणाऱ्या ऍन्टीबॉडीज सापडल्या आहेत. इटलीतील पाळीव प्राण्यांच्या नमुन्यांच्या तपासणीमध्ये ही बाब उजेडात आली आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांनाही करोनाची बाधा होऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
उत्तर इटलीमधील पशुवैद्यकीय भेटींदरम्यान घेण्यात आलेल्या 500 पेक्षा जास्त पाळीव प्राण्यांच्या नमुन्यांची तपासणी ब्रिटनच्या लिव्हरपूल विद्यापीठातील संशोधकांनी केली.
कोणत्याही प्राण्यांची पीसीआर चाचणी पॉझिटिव्हची आली नाही. मात्र 3.4 टक्के कुत्री आणि 3.9 टक्के मांजरींमध्ये सार्स-कोव्ह-2 ला नियंत्रित करणाऱ्या ऍन्टीबॉडीज अगदी मोजता येऊ शकतील, इतक्या प्रमाणात असल्याचे संशोधकांनी सांगितले.
ज्या घरात कोविड रुग्ण आहेत, त्या घरातील श्वानांना कोविडची लागण होणे अगदी स्वाभाविक आहे, असे बायोआरक्सिव्ह या वेबसाईटवरील अहवालात म्हटले आहे.
नमुने घेतले गेले तेंव्हा कोणत्याही प्राण्यामध्ये संसर्गाची लक्षणे दिसली नव्हती. मात्र तरिही कोविड रुग्ण असलेल्या घरातील पाळीव प्राण्यांना या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घ्यावी.
पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून हा विषाणू लोकांपर्यंत पोहोचविण्याचा कोणताही पुरावा नाही. मात्र तरिही नागरिकांनी याचे भान ठेवणे गरजेचे आहे, असे या रिपोर्टमध्ये लिव्हरपूल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर ऍलन रॅडफॉर्ड यांनी म्हटले आहे.