लखनौ – अभिनेत्री आणि 2018 मधील मिस बिकिनी इंडिया स्पर्धेतील विजेती अर्चना गौतम
यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाठोपाठ काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका
गांधी यांच्या `लडकी हूँ लढ सकती हूँ` या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशच्या विधानसभा
निवडणुकीत काँग्रेसने 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याने अनेक
ठिकाणी महिलांना उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये उन्नावमधील बलात्कार प्रकरणात बळी
ठरलेल्या तरुणीच्या आई आशासिंग आणि हस्तिनापूरमधील उमेदवार अभिनेत्री अर्चना गुप्ता
यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
उन्नावमधील भाजपचा निलंबित माजी आमदार कुलदीप सेनगर याला बलात्कार केल्याबद्दल
जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. या प्रकरणात बळी ठरलेल्या तरुणीच्या आईला काँग्रेसने
उन्नावमधून उमेदवारी दिलेली आहे. बलात्काराचा बळी ठरलेल्या तरुणीच्या वडिलांच्या मृत्यू
प्रकरणातही सेनगरला शिक्षा झालेली आहे. 2017 पूर्वी आशासिंह घराच्या बाहेरही पडत
नव्हत्या. मुलीवरील बलात्कार आणि तिचे निधन या घटनेने त्या पुरत्या हादरून गेल्या होत्या.
त्यातच सेनगर हा सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने त्याला वाचवण्याचे प्रयत्न सर्व स्तरावर
झाले. त्याचवेळी आशासिंह आणि त्यांच्या कुटुंबियांना संपवून टाकण्याच्या वारंवार धमक्या
येत असत. आता त्यांनी उन्नावमधून विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी
या मतदारसंघातून उमेदवार उभा न करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे.
काँग्रेसने मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर मतदारसंघातून अभिनेत्री आणि 2018 च्या मिस
बिकीनी इंडिया पुरस्कार मिळवणाऱ्या अर्चना गौतम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी
ग्रेट ग्रँड मस्ती, हसीना पारकर, भारत कंपनी अशा हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच
तमीळ आणि तेलुगू भाषक चित्रपटांतही काम केले आहे. त्याखेरीज साथियाँ साथ निभाना,
कबूल है, सीआयडी अशा मालिकांमध्येही काम केले आहे. मेरठमधील आयआयएमटीमधून
त्यांनी पत्रकार आणि संज्ञापन विषयात पदवी संपादन केलेली आहे. त्यांना काँग्रेसने उमेदवारी
दिल्यानंतर सोशल मिडियावर भाजपच्या समर्थकांनी त्यांची खिल्ली उडवण्यास सुरवात केलीआहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या पत्रकारांचा भरणा असलेल्या ओपइंडिया या
वृत्तसंस्थेनेही एका ट्रोलरचा स्क्रीनशॉट देऊन अर्चना गौतम यांचा उल्लेख दक्षिणेतील सनी
लिओन असा केला आहे.