शिर्डी विधानसभा मतदारसंघात सबकुछ विखे

बाळासाहेब सोनवणे
शिर्डी विधानसभा मतदारसंघात खासदार सदाशिव लोखंडे यांना लाखांचा लीड देऊन तालुक्‍यात सबकुछ विखे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. माजी मंत्री राधाकष्ण विखे पाटील व डॉ. सुजय विखे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. फक्त विजय मिळवणे हे महत्त्वाचे नसून, विखेंची ताकद काय आहे, हे विरोधकांना दाखवून देण्यासाठी शेवटच्या तीन दिवसांमध्ये विखे पाटील यांनी ही निवडणूक स्वतःच्या हाती घेतली. त्यात ते यशस्वीही झाले.

कॉंग्रेसने डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी न दिल्याने व राष्ट्रवादी पक्षाने नगर दक्षिणेमध्ये जागा न सोडल्याने माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर तालुक्‍यातील राजकीय गणित बदलले. एकेकाळचे विरोधक असलेले शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पत्त्यावर राजकीय पत्ते पडले व त्यांचे राजकीय पारडे जड झाले. आमदार कांबळे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी करण्यासाठी विखे यांनी आग्रह केला होता. परंतु कॉंग्रेसने डॉ. सुजय विखे यांना तिकीट न दिल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते राजीनामा दिला.

त्यामुळे आमदार बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडकडे शिफारस करून आमदार कांबळे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली. कांबळे यांनी प्रचारादरम्यान बॅनरवर विखे पाटील यांचा फोटो व नाव छापले नाही. त्यामुळे विखे समर्थक नाराज झाले. आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा घेतली. त्या सभेमध्ये ही व्यासपीठावर विखे-पाटील यांना स्थान दिले नाही. त्यामुळे विखे काय आहे हे दाखवून देण्यासाठी समर्थकांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचारासाठी कंबर कसली. निवडणूक खा. सदाशिव लोखंडे यांची त्यांच्यापुरता मर्यादित न राहाता आ. विखे विरुद्ध आ. थोरात अशी प्रतिष्ठेची झाली. विखे यांनी दक्षिणेत डॉ. सुजय विखे यांचा प्रचार खुलेआम केला.

आ. थोरात यांनी राजकीय व्यासपीठावरून आ. विखे त्यांना राजकीय चिमटे घेतल्यामुळे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिणमध्ये डॉ. सुजय विखे यांना पराभूत करण्यासाठी स्वतःची राजकीय यंत्रणा वापरून वेगवेगळे डावपेच टाकले. त्यामुळे विरोधकांना चपराक देण्यासाठी व आपली राजकीय ताकद दाखवून देण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतःहून ही निवडणूक आपल्या हाती घेतली. शिर्डी मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन लोखंडे यांना मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच आखले. विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजून या निवडणुकीकडे पाहिले. तसेच खा. लोखंडे यांना मोठ्या फरकाने निवडून देऊन तालुक्‍यात पुन्हा एकदा सबकुछ विखे, हे सिद्ध केले. या निवडणुकीमध्ये विरोधकांना मोठी चपराक बसली. नगर दक्षिणमध्ये डॉ. सुजय विखे हे भाजपचे खासदार झाल्याने राहता तालुक्‍यात विखे समर्थकांचे बळ नक्कीच वाढले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.