पुणे- गरीबी हा विषय कोणाच्याही शिक्षणामध्ये आडवा येऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवे. समाजमन व शासन धोरण जेव्हा चांगले निर्णय घेते तेव्हा राष्ट्रउभारणी होते. त्यामुळे स्मारके उभी करायची तर शाळांना स्मारक केले पाहिजे.राष्ट्रउभारणीसाठी प्रत्येकाची ज्ञानाची तहान भागवायला हवी, असे मत शालेय शिक्षण राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागा तर्फे हुजूरपागा इंग्लिश मिडियम स्कूल लक्ष्मी रस्ता या शाळेचे ‘ शोभाताई रसिकलाल धारिवाल इंग्लिश मिडियम स्कूल’ असे नामकरण करण्यात आले. राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कोनशिला व नामफलक अनावरण करण्यात आले. यावेळी आर.एम.धारिवाल फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारिवाल, प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर, सोसायटीच्या मुख्य विश्वस्त जयश्री बापट, अध्यक्षा रेखा पळशीकर, उपाध्यक्षा हिमानी गोखले, सचिव वरदेंद्र कट्टी आदी उपस्थित होते. शोभा धारिवाल यांनी या शाळेसाठी देणगी दिली आहे.
प्रत्यक्षात प्रत्येक शिक्षकाचे काम सैनिकाप्रमाणे आहे. शिक्षणसंस्था व शिक्षक देशाच्या अंतर्गत मजबुतीकरीता कार्य करतात, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.
मराठीसह इंग्रजी माध्यमाकडे आता हुजूरपागा वाटचाल करीत आहे. आताच्या युगाची ही गरज असून आरोग्य आणि शिक्षण या आपल्यासाठी महत्वाच्या बाबी असणे गरजेचे आहे. त्यामध्ये आमचे फाऊंडेशन काम करते. असे शोभाताई धारिवाल यांनी सांगितले.
आजच्या काळात पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमाकडे आहे. त्यामुळे मुली आता हुजूरपागेसारख्या नामांकित संस्थेत इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊ शकतात. तसेच येथील विद्यार्थीनी जागतिक स्तरावर नाव उंचावतील, असे मत दिनकर टेमकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी माध्यम विभागाच्या मुख्याध्यापिका प्रियदर्शनी पुरोहित यांनी केले. प्रास्ताविक म. ग. ए. सोसायटीच्या मुख्य विश्वस्त जयश्री बापट यांनी केले.आभार संस्थेच्या अध्यक्षा रेखा पळशीकर यांनी आभार मानले.