कोल्हापूर -स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 मध्ये कोल्हापूर महापालिका रॅकिंगमध्ये अव्वल येण्यासाठी सर्वांच्या योगदानाची व सहकार्याची गरज असून शहरवासीयांनी दैंनदिन जमा होणारा घरातील कचरा बाहेर न टाकता घरातच ओला व सुका असे विलगीकरण करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 व 5 स्टार रँकिगबाबत आज महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी स्थायी समिती सभागृहात संबंधीत अधिकारी व सर्व आरोग्य निरिक्षक यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत आदि अधिकारी उपस्थित होते.
स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 साठी सर्वेक्षण केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत डिसेंबर अखेर शहरामध्ये तपासणी करण्यासाठी येणार असल्याने या कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन करुन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, महापालिेकची घंटागाडी नागरिकांच्या दारी आलेवर ओला व सुका कचरा वेगवेगळा घंटागाडीकडे जमा करावा. आपल्याकडे घंटागाडी आली नाही अथवा आपल्या परिसरात व रस्त्यावरील कचऱ्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास स्वच्छ सर्वेक्षण या ॲपवर नागरिकांनी फोटो काढून तक्रार नोंदवावी. यासाठी स्वच्छता ॲप प्रत्येकाने डाऊनलोड करावा व त्याचा जास्तीत जास्त वापर करावा.
नागरीकांनी नाल्यामध्ये अथवा गटारीमध्ये कचरा व प्लॅस्टिक टाकू नये. कचऱ्याचे 5 प्रकार अूसन यामध्ये 1.ओला, 2.सुका, 3.घरगुती, जैववैदयकिय उदा. सॅनेटरी पॅड, डायपर, मुदत संपलेली औषधे, 4.घातक कचरा उद.बॅटरी, बल्ब, डास प्रतिबंधीत रयासने, 5. ई कचरा असे प्रकार असून शहरावासीयांनी सदरचा कचरा वेगवेगळे संकलन करुन महापालिकेस द्यावे असे अवाहन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने शहर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होणार आहे. आपल्या घराप्रमाणे शहरही स्वच्छ व सुंदर ठेवणे, ही सर्वांची जबाबदारी असून सर्वांचा यामध्ये सहभाग आवश्यक आहे.
सर्व आरोग्य निरिक्षक यांनी आपल्या प्रभागातील कोंडाळे दैनंदिन तसेच दिलेल्या वेळेवर स्वच्छ करणे आवश्यक आहे. नागरिकांकडून घरातील कचरा ओला व सुका विभक्त गोळा करणे आवश्यक आहे. कंटेनर काढलेनंतर त्या कंटेनरच्या रिकाम्या जागेवर कचरा टाकू देऊ नका, यासाठी प्रबोधन करा. प्रबोधन करुनही कोण नागरीक एैकत नसतील तर त्याठिकाणी रस्त्यावर कचरा टाकत असेल तर कचरा टाकणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करा. कंटेनरमधील कचरा रस्त्यावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. प्लॅास्टिक बंदीबाबत कडक कारवाई करा. उपशहर अभियंता यांनी बांधकामाची खरमाती टाकणेसाठी आपल्या विभागीय कार्यालय क्षेत्रामध्ये जागा निश्चित करावी. त्याठिकाणी खरमाती टाकणेसाठी नागरीकांना आवाहन करा, यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाचा फोन नंबर जाहिर करावा अशा सुचना दिल्या.
महापालिकेची उद्यानेही स्वच्छ असणे आवश्यक आहे. यासाठी उद्यानाची स्वच्छता दोनवेळा करा. उद्यानामध्ये कचरा करण्याऱ्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा अशा सुचना बागा अधिक्षकांना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिल्या. सर्व विभागप्रमुख यांनी दैंनदिन कामजासाठी फिरताना रस्त्यावर कचरा आढळलेस तात्काळ ॲपवर त्याचा फोटो टाकावा. सीएसआर द्वारे फौंटन, चौक, आयलॅण्ड, रस्तादुभाजकांचे सुशोभिकरण करा. हॉकर्स झोन, भाजी विक्रेते यांचा दैंनदिन कचरा गोळा करणेसाठी नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
यावेळी मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, पशुवैदयकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, रावसाहेब चव्हाण, बाबूराव दबडे, उपजल अभियंता आर के पाटील, कामगार अधिकारी अशोक यादव, बागा अधिक्षक अरुण खाडे, सर्व आरोग्य निरिक्षक, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी, सीटी कोऑडीनेटर, एमआयएस तज्ञ आदी उपस्थित होते.