वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. यानंतर ते जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान 22 जून रोजी पीएम मोदींसाठी स्टेट डिनर ठेवण्यात आले आहे. व्हाईट हाऊसच्या मते, अमेरिकेतील मोठ्या संख्येने लोक त्यांना भेटू इच्छितात. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना मोठ्या प्रमाणात विनंत्या येत आहेत.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन पियरे यांनी सांगितले की, अमेरिकेत प्रत्येकाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायचे आहे. मोदी यांना भेटण्यासाठी लोक राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना सतत फोन करत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. यावरून अमेरिकेची भारतासोबत भागीदारी किती महत्त्वाची आहे, हे दिसून येते.
जीन पियरे म्हणाले की, पुढच्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन पंतप्रधान मोदींसाठी स्टेट डिनरचे आयोजन करत आहेत. आम्हाला पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी भारतीय-अमेरिकनांकडून मोठ्या प्रमाणात विनंत्या येत आहेत, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. याशिवाय खासदार आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नेत्यांनाही निमंत्रणांची सातत्याने मागणी होत आहे.
पियरे पुढे म्हणाले की, मोदींचा अमेरिका दौरा ही दोन्ही देशांमधील सखोल आणि घनिष्ठ भागीदारीची पुष्टी करण्याची संधी असेल, जी अमेरिकन आणि भारतीयांना एकत्र बांधते. त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी ते खूप महत्त्वाचे आहे. या भेटीमुळे मुक्त, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि अंतराळ यासह धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारीचे मूल्यांकन करण्याचा सामायिक संकल्प आणखी मजबूत होईल. अमेरिकेमधील नागरिकांमध्ये मोदींविषयी कमालीची आदराची आणि कुतूहलाची भावना असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे, हे विशेष.