ऐश्वर्या मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण ऐश्वर्या तर एकच आहे

भाजपच्या मंत्र्यांने केली ऐश्‍वर्याची तुलना उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसोबत

नवी दिल्ली : कर्नाटकमधील भाजपाच्या मंत्र्याने अभिनेत्री ऐश्वर्या रॉयची तुलना थेट उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीशी करून नवीन वाद ओढावून घेतल आहे. ज्येष्ठ मंत्री के. एस. ईश्वरप्पा असे त्या भाजपाच्या मंत्र्यांचे नाव आहे. कर्नाटकमधील भाजपा सरकार सध्या अस्थिर असून त्यांचे भवितव्य सोमवारी लागणाऱ्या पोटनिवडणुकीच्या निकालावर आहे. अशातच के. एस. ईश्वरप्पा यांनी असे अजब विधान केल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येताना दिसत आहेत.

के. एस. ईश्वरप्पा हे कर्नाटकातील ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शनिवारी हे अजब विधान केले. ते म्हणाले की, ऐश्वर्या मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण ऐश्वर्या तर एकच आहे, तसेच उपमुख्यमंत्री पदाचेही आहे. अपात्र आमदार पोटनिवडणुकीत पुन्हा विजयी झाले तर त्यांच्यापैकी एकाला उपमुख्यमंत्री करावे लागणार आहे का? असा प्रश्न ईश्वरप्पा यांना प्रसार माध्यमांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तुलना ऐश्वर्याशी केली. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्रिपद कोणाला नकोय? सत्तेची ताकद प्रत्येकालाच हवी असते. तारुण्यात आलेल्या प्रत्येकाला ऐश्वर्या रायशी लग्न करावसं वाटतं. पण ऐश्वर्या तर एकच आहे ना. महत्वकांक्षा असली म्हणून प्रत्येकालाच उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकत नाही ?

कर्नाटकमध्ये 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा उद्या सोमवारी निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपची कसोटी असून, सहा जागा जिंकल्याशिवाय येडियुरप्पा सरकार वाचू शकणार नाही. यामुळेच या पोटिनवडणुकीत भाजपाने सारी शक्ती पणाला लावली आहे. नऊ डिसेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या कर्नाटक विधानसभेत 208 सदस्य आहेत. एका अपक्षासहीत भाजपाची सदस्य संख्या 105 आहे. तर कॉंग्रेसचे 66 आणि जेडीएसचे 34 सदस्य आहेत. तसेच बसपाचाही एक सदस्य आहे.

दरम्यान, कर्नाटकातील कॉंग्रेस-जनता दलाचे संयुक्त सरकार 17 आमदारांच्या बंडामुळे पडले होते. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. तसेच विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हे आमदार अनुपस्थित राहिल्याने कुमारस्वामी सरकार गडगडले होते. पुढे या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)