शिवगंध पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे – शरद पवार

  • डॉ. अमोल कोल्हे यांच्या”शिवगंध’चे प्रकाशन

कर्जत – आपल्या पहिल्याच टर्ममध्ये आपल्या धारदार वक्‍तृत्वाने संसदेत भरीव कामगिरी करून दाखवणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राजा शिवछत्रपती भूमिका साकारताना आलेले थरारक अनुभव पुस्तकात बंदिस्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना डॉ. कोल्हे यांना आलेले अनुभव महाराष्ट्राने वाचले पाहिजेत, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लिहिलेल्या आणि डिंपल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या शिवगंध या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या मुंबईतील “सिल्व्हर ओक’ निवासस्थानी ऑनलाइन पद्धतीने झाले. या वेळी बोलताना खासदार शरद पवार यांनी डॉ. अमोल कोल्हे यांचे कौतुक केले.

शरद पवार म्हणाले की, नारायणगावमधून येऊन एक दर्जेदार डॉक्‍टर, तितकाच उत्तम अभिनेता आणि आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये पहिल्याच वर्षी संसद रत्न पुरस्कार मिळवणारा संसदपटू असणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांची वाटचाल मी जवळून पाहतो आहे. माझे स्नेही डॉ. रवी बापट हे मला सुरुवातीपासून डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल सांगत होते. “राजा शिवछत्रपती’ या गाजलेल्या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत असताना आलेल्या अनुभवांविषयी, त्यासाठी घेतलेल्या मेहनतीविषयी त्यांनी “शिवगंध’ या पुस्तकात डॉ. अमोल कोल्हे यांनी रंजकतेने लिहिले आहे.

कर्जत येथील रहिवासी आणि मराठीचे प्राध्यापक असलेले डॉ. नीतिन आरेकर यांनी त्यांचे अनुभव तशाच रंजकतेने शब्दांकित केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या वेळी पुस्तकाचे लेखक आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुस्तकाचे शब्दांकनकार डॉ. नितीन आरेकर यांच्यासह पुस्तकाचे प्रकाशक डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळ्ये, कौतुक मुळ्ये, हॉटेल प्रीतमचे संचालक अमरदीपसिंग कोहली आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.