सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळावेत

रुग्ण हक्‍क परिषद : पैशांअभावी उपचार होईनात, मृत्यू वाढले 

पुणे – “उपचार मिळवण्यासाठी आधी 50 हजार रुपये डिपॉझिट भरा, तरच उपचार मिळतील. पैसे नसतील आणि मृत्यू झाला तर दोषींवर कारवाई होत नाही. पैशांअभावी दररोज होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण गंभीर आहे. गरीब-मध्यमवर्गीय नागरिकांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी कायदा व्हावा म्हणून जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे,’ असे मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

रुग्ण हक्क परिषदेने पुण्यात चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. त्याला राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष शिवाजीराव बुचडे, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते अनिल हातागळे, रवी भिसे, ऍड. विद्या शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या कोमल दीक्षित, दिलीप सरवदे, पुष्पा गाडे, परिषदेचे केंद्रीय कार्यालय सचिव दीपक पवार आदी उपस्थित होते.

‘औषधांचे दर निश्‍चित नाहीत. महागडी औषधे कशी विकली जातील, रुग्णांची लूट कशी होईल. उपचार घेणारे नागरिक कर्जबाजारी कसे होतील, असेच प्रयत्न सर्रास सुरू आहेत. हे बदलण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेने निर्माण केलेल्या लढ्यात ताकदीनिशी उतरले पाहिजे,’ असे मत यावेळी दीक्षित यांनी व्यक्त केले. याशिवाय रुग्णांचे हक्क, चळवळ उभी राहिली पाहिजे, गरजूंना मोफत औषधोपचार या विषयांवर बुचडे, हातागळे, भिसे, गाडे यांनी मत मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक पवार, सूत्रसंचालन दिव्या कोंतम यांनी केले. स्वागत नम्रता पवार यांनी तर आभार अर्चना प्रधान यांनी मानले. गिरीश घाग, आसमा सय्यद, अपर्णा साठे, विजय गायकवाड, रफिक शेख, भरत चव्हाण, विशाल कांबळे, उमर शेख यांनी बैठकीचे संयोजन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.