अजित पवार ः वारकरी मंडळाकडून 1,11,111 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत
लोणी काळभोर (पुणे) -वारकरी बांधवांनी करोनाच्या लढ्यासाठी बहुमोल मदत केली असून, याचे अनुकरण सर्वांनी करावे. कारण करोना विरुद्धच्या लढाईत सर्वांनी योगदान देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
हभप प्रकाशमहाराज बोधले स्थापित अखिल भारतीय वारकरी मंडळा’च्या हवेली तालुका कमिटीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधी कोविड – 19 साठी देण्यात आला. हा धनादेश हवेली तालुका कमिटीचे अध्यक्ष हभप संतोष महाराज काळोखे – देहूकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष हभप आनंद महाराज तांबे, जिल्हाध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर, हवेली तालुका उपाध्यक्ष तुषार महाराज चौधरी, देहूचे माजी सरपंच कांतीलाल काळोखे, तीर्थक्षेत्र कमिटीचे उपप्रमुख बापूसाहेब कंद, दिंडी प्रमुख पोपट महाराज आव्हाळे, संतोष बालवडकर, विलास उंद्रे, दिनकर भालेकर, प्रशांत काळोखे, दिनकर पिंगळे, उपस्थित होते.