नगर (प्रतिनिधी) – करोनामुक्तीसाठी सर्वांच्याच सहकार्याची विशेष गरज आहे. या काळात आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी जिल्हा प्रशासन, पोलिस बजावत असलेले कर्तव्य सर्वांसाठीच खूप उपकारक आहे. त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन आडतेबाजार मर्चंट्स असोसिएिशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपड यांनी केले.
असोसिएशनच्यावतीने जिल्हा रूग्णालयास एक्स-रे मशिन, ईसीजी मशिन, मॉनिटर्स तसेच इतर आवश्यक वैद्यकीय साहित्याची मदत देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे ही मदत सुपुर्द करण्यात आली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा, शैलेश गांधी, गोपाल मनियार, रवींद्र गुजराथी, सुशील भळगट, ललित गुगळे, कांतीलाल गुगळे, मयूर पितळे, किशोर श्रीश्रीमाळ, अजित गुगळे, विजूशेठ गांधी, रितेश कोठारी, राजेंद्र बोथरा आदी यावेळी उपस्थित होते.
शैलेश गांधी म्हणाले, “”करोना काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवितानाच अर्थकारणाला चालना देणेही गरजेचे आहे. प्रशासनाने या दोन्ही गोष्टींची सांगड घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. जिल्हा रूग्णालयात करोना चाचणी, करोनाबाधितांवर उपचार अशा सर्वच गोष्टी होत आहेत. रूग्णसंख्या वाढत असल्याने येथील व्यवस्थेवर ताण येत आहे. अशावेळी रूग्णालयास आवश्यक वैद्यकीय साहित्याची मदत मिळाल्याने रूग्णांना आणखी चांगली सेवा
मिळू शकते.’