‘हर एक को हजार रुपये’; प्रचारासाठी कार्यकर्त्याचा भाव

लोकसभेची रणधुमाळी सुरू होताच ठेकेदार सज्ज


माणसे आणण्याची जबाबदारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर

पुणे – प्रचारासाठी कार्यकर्त्याचा भाव फुटला असून, खाऊन-पिऊन रोज .हजार रुपये असा “रेट’ सध्या सुरू झाला आहे. उपनगरांसह सगळीकडे अशा “झिरो कार्यकर्त्यां’ची लिस्ट तयार झाली असून, “मागणी तसा पुरवठा’ ही “बेसलाईन’ ठेवून ही सगळी तयारी “ठेकेदारांनी’ सुरू केली आहे.

लोकसभेची रणधुमाळी संपूर्ण देशात सुरू झाली आहे. दि.23 एप्रिल रोजी पुणे आणि बारामती तसेच 29 एप्रिल रोजी मावळ, शिरूर या लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. त्या आधी या सगळ्या मतदारसंघांत प्रचाराच्या सभा होणार आहेत. पूर्वी अशा सभांना उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते आणि नेत्यांना ऐकण्यासाठी लोक जमा होत असत, परंतु आता हा “ट्रेन्ड’ बदलला आहे. आता पक्षातील पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य यांना सभा ऐकण्यासाठी प्रेक्षक “हायर’ करावे लागत आहेत. साहजिकच लोकसभा असल्याने पंचक्रोशीतून लाखोंच्या संख्येने सभेला लोक जमा करावे लागणार आहेत. ही माणसे जमा करण्याचे काम प्रत्येक पक्षाने त्या-त्या भागातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर सोपवले आहे.

त्या कार्यकर्त्यांनी प्रचार सभांना, रॅलीला, पदयात्रांना उपस्थित राहण्यासाठी या “झिरो कार्यकर्त्यां’ची लिस्टच तयार करायला घेतली आहे. सभांना उपस्थित राहणे, मोक्‍याच्या वाक्‍यांवर टाळ्या वाजवणे आणि संपूर्णवेळ या सभेमध्ये बसणे अशा अटी त्यांना घालण्यात आल्या आहेत. यामध्ये घरेलु कामगारांपासून ते सुरक्षा रक्षक, परप्रांतीय, बेकार तरूण, रोजंदारीवर काम करणारे, बांधकाम साईटवर काम करणारे मजूर यांचा समावेश आहे.

रोज खाऊन पिऊन एक हजार रुपये असा यांचा भाव आता फुटला आहे. मतदान जसे जवळ येईल तसे हा भाव वधारू शकतो. त्यामुळे अशा “झिरो कार्यकर्त्यां’ना गोळा करणाऱ्यांनीही “बिझनेस माईंड’ने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

घरातील केवळ पुरुषच नव्हे, तर महिलांनाही यामध्ये समाविष्ट करून घेतले आहे. त्यांच्यासाठीही हाच रेट सुरू असून, निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात या महिलाही आता फुल्ल “बिझी’ राहणार आहेत.

वेळही ठरलेली
उन्हाळ्याचे दिवस असल्याने या झिरो कार्यकर्त्यांनी मात्र अट ठेवली आहे. सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या कालावधीत या कामात सहभागी होऊ, असे ठामपणे सांगितले आहे. यामुळे त्यांच्या लहरीप्रमाणेच पक्षप्रमुखांना रॅली, पदयात्रा आयोजित कराव्या लागणार आहेत.

पगारापेक्षा जास्त उत्पन्न
या सगळ्या गडबडीत या कामगारांना दिवसाचा हजार रुपये मिळेल आणि त्यांना पगारापेक्षा जास्त पैसे मिळतील, त्यांची कमाई होईल ही बाब जरी खरी असली तरी हे कामगार या “विशेष’ कामावर असल्याने रोजंदारीच्या कामावर यांना “बुट्टी’ मारावी लागणार आहे. त्यामुळे गृहिणी आणि रोजंदारीवर चालणाऱ्या कामाचा खोळंबा होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.