पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा रोज नवा उच्चांक

602 नवीन बाधित : चार जणांचा मृत्यू

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये रोज वाढ होत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात करोना रुग्णांचे आकडे घटत होते. यामुळे करोना आता शहरातून जातो की काय असे वाटत असतानाच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा आकडे वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज शहरातील तब्बल 602 जणांना करोनाची लागण झाली आहे. हा 2021 मधील एका दिवसात सर्वाधिक लागण झालेला आकडा आहे.

आजपर्यंत शहरातील 1 लाख 7 हजार 832 जणांना करोनाची लागण झाली आहे. एवढेच नव्हे तर आटोक्‍यात आलेले मृत्यू देखील आता हळूहळू वाढत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये करोनामुळे चार रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 602 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. वर्ष 2021 मधील हा उच्चांकी आकडा आहे. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील एका व शहराबाहेरील तिघांचा समावेश आहे. रावेत येथील 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील वडगाव शेरी, खडकी, जळगाव येथील 3 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2634 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात 255 रुग्णांना घरी सोडले. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 714 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3118 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 756 रुग्णांचे अहवाल
प्रतीक्षेत आहेत. सद्यःस्थितीत महापालिकेच्या रुग्णालयात 1241 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 3022 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 4266 इतकी आहे.

आज 2593 जणांचे लसीकरण
शुक्रवारी महापालिकेच्या आठ कोविड-19 लसीकरण केंद्रांमध्ये 2142 तर अन्य पाच खासगी रुग्णालयात 2593 जणांचे लसीकरण केले. शहरातील एकूण 30972 जणांना लस देण्यात आली आहे.

“ड’ प्रभाग हॉटस्पॉट
पिंपरी-चिंचवड शहरातील ड प्रभाग हा करोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरतोय. रोज या प्रभागातून रुग्ण आढळत असून शुक्रवारी देखील येथून 104 रुग्ण आढळले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील भोसरी व पिंपरीतील जिजामाता रुग्णालय झोनमध्ये सर्वाधिक रुग्ण उपचारासाठी आज दाखल झाले आहेत. भोसरी रुग्णालय हद्दीत 119 तर जिजामाता रुग्णालयात परिसरात 120 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आकुर्डी 53, सांगवी 61, तालेरा 89, थेरगाव 56, यमुनानगर 65 व वायसीएम रुग्णालयामध्ये 39 रुग्णांची नोंद झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.