मुंबई – मराठी सिनेमांनी इतिहास घडवत तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. यापैकी काही एव्हरग्रीन संगीतप्रधान मराठी चित्रपट कायमचे रसिकांच्या मनावर कोरले गेले. यापैकीच एक आहे ‘अशी ही बनवाबनवी’. या सिनेमातील गाणी आजही पॉप्युलर आहेत. कोणत्याही वयातील रसिकांच्या मनात प्रेमाचा वसंत फुलवणारं ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे ‘अशी ही बनवाबनवी’मधील एव्हरग्रीन गाणं आता नवा साज घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे. १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘टकाटक २’ या सिनेमात ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे गाणं नव्या रूपात पहायला मिळणार आहे. ‘टकाटक २’च्या निर्मात्यांनी नुकतीच या संदर्भातील घोषणा केली आहे.
‘टकाटक’च्या रुपात मराठी तिकीटबारीवर नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या चित्रपटाचा सिक्वेल ‘टकाटक २’च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन मिलिंद कवडे यांचं आहे. अंडरकरंट एक महत्त्वपूर्ण संदेश देणाऱ्या या सिनेमात ‘हृदयी वसंत फुलताना…’च्या नव्या रूपाचा आनंदही लुटता येणार आहे. या गाण्यात कोणकोणते कलाकार परफॉर्म करणार, गाणं कोण गाणार, संगीत कोण देणार या सर्वच गोष्टी गुलदस्त्यात आहेत. नवा साज घेऊन तयार करण्यात येणारं गाणं ‘टकाटक २’मध्ये प्रमोशनल साँग म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे.
‘टकाटक २’ निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, नरेश चौधरी, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. १८ ऑगस्ट रोजी ‘टकाटक २’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.