अखेर शिक्षक भरतीचे “पवित्र’ पोर्टल सुरू! 

नगर – गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेले शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल सुरू झाले आहे. या पोर्टलवर 20 जूनपासून इच्छुक उमेदवारांना परीक्षा क्रमांकानुसार जाहिराती दिसणार आहेत, तसेच प्राधान्यक्रम 25 ते 30 जूनदरम्यान लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीबाबत गोंधळ सुरू आहे. भरतीसाठीचे पवित्र पोर्टल तांत्रिक कारणामुळे सातत्याने बंद पडत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपासून बंद असलेले पवित्र पोर्टल दोन दिवसापूर्वी सुरू झाले आहे. त्यामुळे आतातरी इच्छुक उमेदवारांना परीक्षा क्रमांकानुसार जाहिराती दिसतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शिक्षण संस्थांमधील 12 हजारांवर जागा भरण्यात येणार आहेत. शिक्षक भरतीमध्ये सध्या पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांच्या पात्रता व विषयांनुसार प्राधान्यक्रम यादी येत आहे; मात्र ही यादी अंतिम करता येत नाही. प्राधान्यक्रम भरण्यास अगोदर 22 मेपासून 31 मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु पवित्र पोर्टल बंद पडले होते. त्यामुळे जाहिराती दिसत नव्हत्या आणि उमेदवारांना प्राधान्यक्रम भरतानासुद्धा अडचणी येत होत्या.

आता दोन दिवसांपासून पवित्र पोर्टल सुरू झाले आहे. त्यामुळे आतातरी जाहिराती दिसतील का, आणि उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येईल का, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पवित्र पोर्टल सुरू झाल्यामुळे परीक्षा क्रमांकानुसार जाहिराती दिसणार आहेत. जाहिरात दिसल्यावर प्राधान्यक्रम भरता येईल. प्राधान्यक्रम न भरता आल्यास उमेदवारांसाठी 25 ते 30 जून या कालावधीत सुविधा सुरू राहील. उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम डाउनलोड केल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा 25 ते 30 पर्यंत उपलब्ध राहील. त्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी 20 जूनपर्यंत पोर्टलवर उपलब्ध जाहिरातींचा अभ्यास करूनच योग्य निर्णय घ्यावा.

Leave A Reply

Your email address will not be published.