अखेर काटेवाडीतील नर जातीचा बिबट्या जेरबंद

मादी जातीचा बिबट्या पिंजऱ्यापासून पळाल्याने बिबट्याची दहशत कायम

– नवनाथ बोरकर

बारामती – तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करत बिबट्याने जनावरे ठार केली होती. त्यामुळे बारामती तालुक्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बिबट्याला पकडण्यासाठी भागात संतोष जाधव यांच्या उसाच्या शेतामध्ये वन विभागाने पिंजरा लावला होता. अखेर आज पहाटेच्या सुमारास लावलेल्या पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. मात्र मादी जातीचा बिबट्या पळाल्याने अजूनही भीतीचे वातावरण आहे.

बारामती तालुक्यातील कण्हेरी-काटेवाडी ढेकळवाडी आणि पिंपळी लिमटेक या भागातील शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हा बिबट्या हल्ला करत जनावरे ठार करत होता यामुळे या गावातील ग्रामस्थांनी या बिबट्याची धास्ती घेतली होती. गेल्या आठ दिवसापासून वनविभागाने काटेवाडी आणि कन्हेरी परिसरात सहा ट्रॅप कॅमेरे आणि तीन पिंजरे लावले होते. त्यानुसार आज पहाटे कण्हेरी भागातील संतोष जाधव यांच्या उसाच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला, अशी महिती रेस्क्यू टीमचे अभिजित महाले, बारामतीचे वनपाल अधिकारी त्रिंबक जराड यांनी दिली.

गेले दोन महिने सातत्याने बिबट्या शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करत होता. बिबट्या हा सातत्याने उसाच्या शेतामध्ये लपून बसत होता. त्यामुळे ऊसतोड मजूर देखील ऊस तोडण्यास धजावत नव्हते. आज अखेर पहाटे जाधव यांच्या उसाच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला. यामुळे वनविभाग आणि रेस्क्यू टीमचे अभिनंदन करतो त्यांनी अथक परिश्रम घेऊन या बिबट्याला जेरबंद केले.

– सुधीर पानसरे, ग्रामस्थ 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.