शेवगाव – लोकनेते मारुतराव घुले पाटील, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार व साखर संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेतून ऊस दर आणि अन्य मागण्या बाबत तोडगा निघाला. अखेर गेल्या अनेक दिवसापासूनची कोंडी फुटून २४११ रू प्रति टन भाव जाहीर करण्यात आला. तसेच उसाचे पेमेंट हे एक रकमी देण्याचेही यावेळी मान्य करण्यात आल्याने संघटनेने आज पहाटे पासून सुरु केलेले आंदोलन आटोपते घेतले.
ऊस दराच्या संदर्भात येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर सहसंचालक अहमदनगर यांना ऊसदर वाढवून, होणारे पेमेंट एकरकमी मिळावे या प्रमुख मागणी साठी वेळोवेळी निवेदने दिली होती. तथापि साखर सहसंचालक कार्यालयाने याबाबत कोणतीही भूमिका न घेतल्याने आज शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकनेते मारुतराव घुले पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर जाऊन पहाटे चार वाजता कारखान्याचा काटा बंद केला होता.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची झाली, आंदोलनाबाबत कारखाना प्रशासनाला कल्पना असल्यामुळे त्यांनी मोठा पोलिस बंदोबस्त कारखाना कार्यस्थळावर ठेवला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकार्यांनी काट्यावर ठिय्या मांडून मोठी घोषणाबाजी केली. कारखाना प्रशासनाचे अधिकारी व ज्येष्ठ संचालकांच्या मध्ये अनेक वेळा चर्चेच्या फेर्या झाल्या तरी मार्ग निघत नसल्याने त्यांच्याशी चर्चा करत पदाधिकाऱ्यांनी आंदोलन चालूच ठेवले. शेवटी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार व साखर संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांनी स्वतः आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली.
यावेळी सकारात्मक चर्चा होऊन उस दराबाबतच्या मागणीची अनेक दिवसापासूनची कोंडी अखेर फुटून एफ आर पी पेक्षा अधिक, २४११ रू प्रति टन भाव जाहीर करण्यात आला, तसेच उसाचे पेमेंट हे एक रकमी देण्यात येईल, असेही यावेळी मान्य करण्यात आले. त्याचबरोबर इतर मागण्याही मान्य करण्यात आल्या.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब लवांडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे औरंगाबाद चे अध्यक्ष माऊली मुळे, ज्येष्ठ चंद्रकांत झारगड, अंबादास कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र आर्ले, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, दादा टाकळकर, शेवगाव तालुका अध्यक्ष प्रशांत भराट, उपाध्यक्ष मेजर अशोक भोसले, भाऊ बैरागी, युवकचे अध्यक्ष अमोल देवढे, संदीप मोटकर, दादा पाचरणे, भैय्या राउत, विकास साबळे, अप्पू लाड, नारायण पायघन, सुनील थोरात, नाना कातकडे, राम गोरे, माऊली कराड, संजय पांडव, गजानन जमधडे, भीमा भोंडे, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी कारखाना प्रशासनाच्या वतीने आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यावेळी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, उपनिरीक्षक नितीन पाटील, समाधान भाटेवाल यांच्या सह मोठा पोलिस बंदोबस्त होता, तसेच नेवाशाचे नायब तहसीलदार राजेश गायकवाड हेही यावेळी हजर होते.
ज्ञानेश्वरच्या यशस्वी तडजोडीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा शेवगाव तालुक्यातील गंगामाई या खासगी साखर कारखान्याकडे वळविला.
तेथेही कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गेटवर उसाने भरलेली वाहने अडवली. तसेच उसाची गव्हाण बंद केली. गंगामाई साखर कारखाना व्यवस्थापनाने देखील सकारात्मकता दाखवून भाव जाहीर केला. त्यांनी प्रतिटन २३५१ रु . तर टायर गाडीला प्रतिटन २४०० रु .भाव जाहीर केला आहे.